मुंबई - टास्कच्या नावाखाली नागरिकांचे खाते रिकामे करणाऱ्या टोळीचा मुलुंड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. नायजेरियन नागरिकासह पाचजणांना मुलुंड पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडे १६ मोबाइल, ११ सिमकार्ड, १४ एटीएम कार्ड, ११ चेकबुक, ४ पासबुक आणि दोन लॅपटॉप जप्त करण्यात आले आहे. या टोळीने मुंबईसह राज्यभरात फसवणूक केल्याचा संशय असून अधिक तपास सुरू आहे.
मुलुंड पोलिसांनी गुन्हा नोंदवत तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू केला. नालासोपारा येथे राहणाऱ्या सोपुलू सॅम्युएल (वय ४३), अजय जगदीश पाठक (३४), जाकीर हुसैन अन्सारीऊर्फ गुलाम (४३), मोहम्मद इमरान खान (४२) यांच्यासह मोहम्मद आझम नमुद्दीन कादर (३४) या कर्नाटकच्या आरोपीला अटक करत एक लाखाची रक्कम गोठविण्यात यश आले आहे. मुलुंड परिसरातील तक्रारदार महिलेची या टोळीने अडीच लाखांची फसवणूक झाली. अनोळखी क्रमांकावरून व्हॉटस्ॲपवर पार्टटाइम नोकरीचा संदेश आला. तिने अधिक चौकशी करताच, टेलिग्राम ॲपवरील लिंक पाठवून टेलिग्राम ग्रुपवर रजिस्ट्रेशन करण्यास भाग पाडले. पुढे, वेगवेगळे टास्क पूर्ण केल्यास पैसे देण्याचे आमिष दाखवत फसवणूक केली.
असे चालायचे रॅकेट नायजेरियन हा टेलिग्राम लिंक बनवून फ्रॉड करत होता. आझम हा त्याला अकाउंट पुरविण्याचे काम करायचा. नालासोपारा येथे राहणारा अजय पाठक हा नालासोपारा येथील एटीएममधून पैसे काढण्याचे काम करायचा. अन्य दोन आरोपी काढलेली रक्कम नायजेरियन आरोपीपर्यंत पोहोचविण्याचे काम करत असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.