मुंबई : मुंबईतील मानव-बिबट्या सहसंबंधाचा अभ्यास करण्यासाठी बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट्याला शनिवारी टेलिमेट्री लावण्यात आला आहे. त्यामुळे शहरी बिबट्यांच्या जीवनशैलीचे रहस्य उलगडण्यास मदत होणार आहे.
शनिवारी टेलिमेट्री लावल्यानंतर तीन वर्षांच्या या बिबट्याला यशस्वीरीत्या पुन्हा जंगलात सोडण्यात आले आहे. यापुढे या मादी बिबट्याच्या हालचालींवर नजर ठेवली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. शनिवारी सायंकाळी पार पडलेल्या या प्रक्रियेत डाॅ. अत्रेय यांच्याबरोबर उद्यानाचे पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. शैलेश पेठे आणि वन्यजीव संशोधक निकीत सुर्वे उपस्थित होेते.
मुंबईच्या मध्यभागी वसलेल्या नॅशनल पार्कमध्ये ४७ बिबट्यांचे वास्तव्य आहे. या बिबट्यांवर रेडिओ काॅलर बसवून त्यांचा भ्रमण मार्ग, अधिवास आणि आवास क्षेत्र समजून घेण्याच्या अभ्यासाला सुरुवात झाली आहे. हा अभ्यास करण्यासाठी गेल्यावर्षी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि ‘वाइल्ड लाइफ काॅन्झर्व्हेशन सोसायटी-इंडिया’मध्ये सामंजस्य करार झाला होता. त्यानंतर या प्रकल्पाला प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), महाराष्ट्र यांची परवानगीही मिळाली होती.
वन्यजीव संरक्षण कायद्याच्या प्रथम श्रेणीमध्ये बिबट्या हा प्राणी संरक्षित आहे. त्यामुळे त्याला रेडिओ काॅलर लावण्याकरिता पकडण्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या परवानगीचीही आवश्यकता होती. ही परवानगी मिळाल्यानंतर शनिवारी संध्याकाळी वन्यजीव संशोधक डाॅ. विद्या अत्रेय यांच्या मार्गदर्शनात एका मादी बिबट्याला रेडिओ काॅलर लावण्यात आली.
अभ्यासातून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न
पुढच्या कालावधीत नॅशनल पार्कला लागून असलेल्या शहरी भागाच्या आसपास वावर करणाऱ्या दोन मादी आणि दोन नर बिबट्यांना रेडिओ काॅलर लावण्यात येईल. त्यानंतर बिबट्यांचा दोन वर्षे अभ्यास केला जाईल. मानव आणि बिबट्या यांचे परस्पर संबंध कसे निर्माण होतात. तसेच बिबटे हे मानवी जीवनासोबत कसे जुळवून घेतात, याचा अभ्यास या माध्यमातून करण्यात येणार आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील बिबटे तेथील जागेचा वापर कसा करतात तसेच त्यांचे भ्रमण कसे होते, याबाबतही या अभ्यासातून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न आहे.