मुंबई : दिवाळसणाला अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयातील आगीत शनिवारी ११ निष्पाप रुग्णांचे प्राण गेले. गेल्या दीड-दोन वर्षांपासून सातत्याने राज्यातील रुग्णालयात आगीच्या घटना घडत आहेत आणि निरपराध लोकांना जीव गमावावा लागला आहे. या घटना का घडतात, त्यावर नेमका इलाज आरोग्य खात्याला का जमत नाही, आणखी किती निरागस लोकांचा बळी घेणार असे संतप्त सवाल जनता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना करीत आहे. आणखी काही प्रश्न...
गंभीर दखल घेतली म्हणजे काय?
दुर्घटनेनंतर मंत्री ‘आम्ही या घटनेची गंभीर दखल घेतली आहे,’ असे कोरडे वक्तव्य करतात. मुळात गंभीर दखल घेणे म्हणजे काय? नुसताच चौकशीचा फार्स केला जातो. खरे दोषी मासोळीसारखे सुटून जातात. जबाबदारी निश्चित होत नाही. पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’ सुरू होते. फायर ऑडिटचे काय होते, स्ट्रक्चरल ऑडिट केले जाते का, त्यासाठी निधी दिला जातो का हे कुणाच्या गावीही नसते.
काय करतात आरोग्य मंत्री व त्यांचे मंत्रालय?
अहमदनगर रुग्णालयाचे फायर ऑडिटच झाले नव्हते. जिल्हा शल्यचिकित्सकांनी मंत्रालयात तक्रारी केल्याची बाब पुढे आली आहे. काय झाले त्या तक्रारींचे? त्यावेळी निर्णय घेऊन हालचाली केल्या असत्या तर हे बळी गेले नसते. या हलगर्जीपणामुळे निष्पापांचे जीव गेले.
चौकशीचे काय होते?
अहमदनगर रुग्णालयात फायर स्प्रिंकलर, फायर हायड्रेयशन प्रणालीसाठी आरोग्य आयुक्तांकडे आर्थिक मंजुरीसाठी प्रस्ताव दिला होता. तो प्रलंबित आहे. आरोग्यमंत्री टोपे सांगतात, दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल व फायर ऑडिटमधील त्रुटी दूर करण्यासाठी निधी देऊ. वस्तुस्थिती ही आहे की, गेल्या दीड-दोन वर्षांतील दुर्घटनांनंतर एक-दोन अपवाद वगळले तर बाकी प्रकरणांत आरोपपत्रही दाखल झालेले नाही. आता निधी देणार म्हणता, मग आधी का दिला नाही?
चालू वर्षातील दुर्घटना
- ९ जानेवारी २०२१. भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीत ११ नवजात बालकांचा मृत्यू.
- २५ मार्च २०२१. भांडुप येथे कोवीड रुग्णालयाला आग, ११ रुग्णांचा मृत्यू.
- २ एप्रिल २०२१. नागपूरच्या खासगी रुग्णालयाला आग, ४ रुग्णांचा मृत्यू.
- २१ एप्रिल २०२१. नाशिकच्या मनपा रुग्णालयात ऑक्सिजन गळती होऊन २२ रुग्णांचा मृत्यू.
- २१ एप्रिल २०२१. मुंब्रा येथे खासगी रुग्णालयाला आग, ४ रुग्णांचा मृत्यू.
- २३ एप्रिल २०२१. विरार येथे खासगी रुग्णालयाला आग, १५ रुग्णांचा मृत्यू.