Join us  

सांगा, शेतकऱ्यांनी  कसं जगायचं? - शेट्टी; भाजीपाला दराच्या घसरणीवर चिंता 

By नामदेव मोरे | Published: December 11, 2022 8:39 AM

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हिवाळा सुरू झाल्यापासून भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असून, बाजारभाव घसरू लागले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटो, कोबी, फ्लॉवरच्या दरामध्ये प्रचंड घसरण झाली आहे. दोन रुपये किलोपासून बाजारभावाची सुरुवात होत आहे. सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाल्याचा दावा करत असून, वास्तवात शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाएवढीही रक्कम मिळत नसल्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हिवाळा सुरू झाल्यापासून भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असून, बाजारभाव घसरू लागले आहेत. शनिवारी मार्केटमध्ये ६२४ ट्रक, टेम्पोमधून ३१११  टन भाजीपाल्याची आवक झाली आहे. यामध्ये ५ लाख ४७ हजार जुडी पालेभाज्यांचा समावेश आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सकाळी बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटला भेट दिली. याठिकाणी काही वस्तूंचे दर खूपच घसरल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

पैसे बुडविणाऱ्यांवर नियंत्रण हवे बाजार समितीमध्ये कोणी शेतकऱ्यांचे पैसे बुडविले तरी ते वसूल करण्याची यंत्रणा आहे. परंतु मुंबई परिसरात काही परराज्यांतील व्यक्ती शेतकरी असल्याचे भासवून व्यापार करत आहेत. संबंधितांनी शेतकऱ्यांचे पैसे बुडविले तर त्यांना शोधायचे कुठे?, असा प्रश्न व्यापारी महासंघाने केला. त्यांनी शेट्टी यांना बाजार समितीमधील समस्यांविषयी निवेदनही दिले.

मुंबई बाजार समितीमध्ये भाजीपाल्याचे दर घसरल्याचे निदर्शनास आले. शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळाला पाहिजे. मुंबई विभागात शेतकरी असल्याचे भासवून काही परराज्यांतील विक्रेते थेट मुंबई व उपनगरात व्यापार करत आहेत. त्यांच्याकडूनही शेतकऱ्यांचे पैसे बुडविले जाण्याचे प्रकार घडत असून, याविषयीही सरकारने ठोस निर्णय घेतला पाहिजे. - राजू शेट्टी, संस्थापक, स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स :राजू शेट्टीशेतकरी