कारमध्ये बसून सांगा स्टार्टअपची संकल्पना; आयआयटीच्या ‘ई सेल’चा नवउद्यमींसाठी उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 05:33 AM2022-10-31T05:33:03+5:302022-10-31T05:33:19+5:30
ई सेलकडून आयोजित स्टार्टअप कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी बनविलेल्या विविध स्टार्टअप प्रकल्पांचे प्रदर्शनही भरविण्यात आले होते.
मुंबई : गाडीत बसून आपल्या स्टार्टअपची संकल्पना उद्योजकांना सांगायची, आपल्या स्टार्टअपमधून काय वेगळा प्रयोग करणार आहोत त्याचा समाजाला आणि उद्योगजगताला कसा उपयोग होणार आहे हे पुढील पाच मिनिटांत पटवून द्यायचे. त्यानंतर आपली संकल्पना समोरील भांडवलदाराला आवडली तर तो निश्चित गुंतवणूक करणार, अशी आहे आयआयटीच्या ‘ई सेल’च्या ‘पीच इन कार’ची संकल्पना! आयआयटीच्या ‘ई सेल’चे हे २५वे वर्ष असून त्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन आयआयटी संकुलात करण्यात आले आहे. त्यामधील ‘पीच इन कार’ या हटके संकल्पनेला विद्यार्थ्यांच्या स्टार्टअप्सचा चांगला प्रतिसाद मिळाला.
आयआयटी मुंबईच्या उद्योजकता सेल (इंटरप्रीन्युअरशिप सेल) हा विद्यार्थ्यांमार्फत चालवला जाणारा विभाग आहे. देशातील लोकांमध्ये उद्यमशीलतेची भावना वाढवण्याच्या उद्देशाने आयआयटीच्या विद्यार्थ्यांद्वारे हा विभाग चालवला जातो. ई सेलच्या अनेक उपक्रमांना युनेस्को, स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया इत्यादी संस्था आणि योजनांतर्गत मदत आणि मान्यताही मिळाली आहे. २५ व्या वर्षाच्या निमित्ताने आयआयटी मुंबईकडून रविवारी व्हर्च्युअल गेम्स, विविध स्टार्टअप्सचे प्रदर्शन, आयआयटीमधील विविध विभागांतील विद्यार्थ्यांच्या स्पर्धा, सेलिब्रिटींशी गप्पा असा भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
ई सेलकडून आयोजित स्टार्टअप कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी बनविलेल्या विविध स्टार्टअप प्रकल्पांचे प्रदर्शनही भरविण्यात आले होते. विद्यार्थ्यांना केवळ वर्गात पुस्तकी ज्ञान व धडे शिकवीत त्याचा प्रत्यक्षात कसा आणि कुठे वापर करावा, यासाठी हे प्रकल्प तयार करून विद्यार्थ्यांकरवी त्यांचे प्रात्यक्षिक देणे आवश्यक असल्याची माहिती प्रा. बी. के. चक्रवर्ती यांनी दिली.
या स्टार्टअप प्रयोगांमध्ये सोलार ऊर्जेपासून ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांसाठी सोलार लॅम्प बनविण्यापासून ते सीमेवरील भारतीय सैनिकांसाठी बुलेटप्रूफ हेल्मेटपर्यंतच्या स्टार्टअप्सचा समावेश आहे. प्रदूषित झालेल्या पाण्यातील आरोग्यास हानिकारक असे अर्सेनिकसारखे घटक कोणत्याही रासायनिक किंवा इलेक्ट्रिकल ऊर्जेशिवाय काढण्याची फिल्ट्रेशन पद्धती ते साध्या कॉपरच्या पाण्याच्या बाटल्या दैनंदिन आयुष्यात का आणि किती उपयुक्त ठरतात इथपर्यंतच्या प्रयोगांचाही समावेश या स्टार्टअप प्रदर्शनात करण्यात आला होता.