मुंबई - केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला आज मुंबईतून सुरुवात झाली आहे. नारायण राणे मुंबई विमानतळावर येताच मोठी गर्दी त्यांना घ्यायला जमा झाली होती. त्यानंतर, या जनआशीर्वाद यात्रेतही मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकारी जमा झाले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेही या जनआशीर्वाद यात्रेत सहभागी आहेत. यावेळी, कोरोना आणि मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनावर फडणवीसांनी भाष्य केलं.
मुख्यमंत्र्यांनी चिंता करणं योग्य आहे, मुख्यमंत्र्यांनी अशी काळजी करायलाच हवी. पण, मुख्यमंत्र्यांनी अशी चिंता करताना राष्ट्रवादीला सांगितलं पाहिजे, काँग्रेसला सांगितलं पाहिजे आणि शिवसेनेलाही सांगितलं पाहिजे. केवळ, आम्हाला ब्रह्मज्ञान आणि त्यांच्यासाठ कोरडे पाषाण.. असं मुख्यमंत्र्यांनी करू नये, हीच अपेक्षा असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईतील जनआशीर्वाद यात्रेतील गर्दीवरुन विचारलेल्या प्रश्नावर फडणवीसांनी उत्तर दिलं. यावेळी, मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता केलेल्या टीकेवरही त्यांनी पलटवार केला.
काय म्हणाले होते मुख्यमंत्री
"नियमांचा भंग करून राजकीय, सामाजिक, धार्मिक व इतर कार्यक्रम आयोजित करून सर्वसामान्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होईल, अशी काही जणांची वर्तणूक पाहता चिंता वाटते, असे म्हणत भाजपाच्या जनआशीर्वीद यात्रेवर मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता निशाणा साधला होता. आगामी सण आणि उत्सव पाहता आरोग्याच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही आणि कोविड योद्धा होता आले नाही तरी निदान कोविडदूत बनून तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणार नाही, याची खबरदारी घ्या," असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं होतं.
सावधपणे पाऊल टाकणे गरजेचं "राज्यातून कोविडची लाट संपलेली नाही. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करून संसर्ग एका मर्यादेच्या पलिकडे वाढू दिला नाही. यामध्ये ज्याप्रमाणे आपले डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर्स यांचे यश आहे, तसेच आपण नागरिक म्हणून घेतलेली काळजी देखील महत्वाची आहे. यापुढे प्रत्येक पाऊल सावधपणे टाकणे गरजेचे असून, आपले सगळ्यांचे सहकार्य अपेक्षित आहे. केवळ अर्थचक्र सुरळीतपणे सुरु राहावे म्हणून आपण काही प्रमाणात निर्बंध शिथिल केले आहेत, हे विसरता कामा नये," असं वक्तव्य ठाकरेंनी म्हटलं.