लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई महापालिकेची सत्ता हाती असताना गेल्या २५ वर्षांत उद्धव ठाकरे यांनी मुंबईसाठी केलेले एक चांगले काम दाखवा, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली. महायुतीचे उत्तर मुंबईतील उमेदवार पीयूष गोयल यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, भाजप मुंबई अध्यक्ष ॲड. आशिष शेलार, खासदार गोपाळ शेट्टी, उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, आमदार प्रवीण दरेकर, विजय गिरकर, योगेश सागर, अतुल भातखळकर, सुनील राणे, मनीषा चौधरी, प्रकाश सुर्वे, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष इंद्रपाल सिंह, आरपीआयचे उत्तर मुंबई अध्यक्ष रमेश गायकवाड आदी उपस्थित होते. मुंबईमध्ये विविध विकास कार्यांचा धडाका लावत प्रत्येक वर्गातील माणसाचे जीवन सुकर करण्याचा विडा केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकारने उचलला आहे. यंदाची निवडणूक ही सामान्य माणसाच्या विकासासाठीची निवडणूक आहे. यापुढे पाच वर्षे विकासाचे इंजिन वेगाने धावण्यासाठी देशाची सूत्रे मोदी सरकारच्याच हाती द्यायला हवी, अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली.
कुठल्या इंजिनवाल्या रेल्वेत बसायचे...महायुती म्हणजे सर्वसामान्यांना सामावून घेत सर्वांगीण विकास करणारी रेल्वे आहे. अशा रेल्वेमध्ये आपल्याला बसायचे आहे की विरोधकांच्या वेगवेगळ्या दिशेने जाणाऱ्या इंजिनवाल्या रेल्वेत बसायचे आहे, हे सुज्ञ मतदारांनी ठरवायचे आहे. - देवेंद्र फडणवीस
...म्हणून ठाकरे गटाचा पळ उत्तर मुंबईच्या प्रत्येक गल्लीत ‘मोदी है तो मुमकिन है’चा गजर सुरू असल्याने विरोधकांचे धाबे दणाणले आहे. ठाकरे गटाने म्हणूनच येथून पळ काढला. गोयल हे पाच लाखांच्या विक्रमी मताधिक्याने विजयी होणार असून मुंबईतील सर्वच्या सर्व सहा जागा महायुतीच जिंकणार. - आशिष शेलार