मुंबई : बहुचर्चित चाँद मदार हत्याकांडातून विशेष मकोका न्यायालयाने तेलमाफीया मोहम्मद अली अबू कादर शेखची पुराव्यांअभावी सुटका केली़ याच्यासह अजून सहा आरोपींचीही न्यायालयाने सुटका केली़ यामुळे गुन्हे शाखेला जबरदस्त झटका बसला आहे़मदारदेखील तेलमाफीयाच होता़ त्याच्यात आणि अलीमध्ये वाद होता़ या वादातूनच १५ सप्टेंबर २०१० रोजी चाँदची दक्षिण मुंबईतील एका हॉटेलच्या बाहेर हत्या झाली़ या हत्येप्रकरणी गुन्हे शाखेने अलीला हत्येच्या चार दिवसांनंतर लगेचच अटक केली़ त्यानंतर इतर आरोपींना अटक करण्यात आली़ अलीने चाँदची हत्या करण्यासाठी गँगस्टर छोटा शकीलची मदत घेतली होती़ या हत्येचा संपूर्ण कटच अलीने रचला होता़ या कटानंतरच अलीचा साथीदार अख्तर अल्लारखा हा चाँदवर पाळत ठेवून होता़ चाँदच्या प्रत्येक हालचालीवर अख्तरचे बारीक लक्ष होते़ अखेर संधी साधून चाँदची हत्या करण्यात आली़ मात्र सरकारी पक्षाने सादर केलेल्या पुराव्याने अली या हत्येसाठी दोषी असल्याचे सिद्ध होत नाही़ तसेच इतर आरोपींविरुद्धही सरकारी पक्षाकडे सबळ पुरावे नाहीत़ तेव्हा आरोपींची या आरोपीतून सुटका करावी, अशी मागणी बचाव पक्षाने केली़ ती ग्राह्य धरत विशेष मकोका न्यायाधीश ए़ एल़ पानसरे यांनी अलीसह इतर सर्व आरोपींची या हत्येतून सुटका केली़ सरकारी पक्ष या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान देणार आहे़ यासाठी आधी विधी तज्ज्ञांचे मत घेतले जाणार आहे़
तेलमाफीया मोहम्मद अली पुराव्यांअभावी सुटला
By admin | Updated: March 22, 2015 01:46 IST