लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी आरोपी असलेले प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांच्या वतीने विशेष एनआयए न्यायालयात जामिनासाठी बुधवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. तेलतुंबडे यांनी देशाविरुद्ध युद्ध छेडले, युद्ध छेडण्याचा प्रयत्न केला, देशाविरुद्ध युद्ध छेडण्यासाठी इतरांना प्रोत्साहित केले, असे आरोप एनआयएने त्यांच्यावर दाखल केले आहेत.
तेलतुंबडे यांनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनमध्ये चाळीस वर्षे काम केले आहे. या कंपनीत ते कार्यकारी संचालक हाेते. त्यानंतर सहा वर्षांसाठी व्यवस्थापक संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले हाेते. ते गरीब कुटुंबातील असून केवळ स्वतःची बुद्धी व मेहनतीच्या बळावर ते एवढ्या मोठ्या पदावर पोहोचले आहेत. ते जगात दलित साहित्यासाठी प्रसिद्ध आहेत. मात्र, जातीभेद करणाऱ्या काही लोकांना हे पचले नाही म्हणून त्यांनी नाहक खोटे आरोप केले व त्यात मला गोवले, असे तेलतुंबडे यांनी याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेत नमूद केले आहे.‘तपास यंत्रणेला माझ्याविरुद्ध काहीही पुरावे सापडले नाहीत. मी सीपीआय(एम)शी संबंधित आहे, हेही दर्शविणारे पुरावे एनआयएकडे नाहीत. तेलतुंबडे स्वतः सीपीआय(एम)च्या विचारधारेचे टीकाकार आहेत. तपासयंत्रणेने केलेले सर्व आरोप तथ्यहीन आहेत,’ असे तेलतुंबडे यांनी याचिकेत म्हटले आहे.