तापमान घसरले, तरीही उन्हाच्या झळा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:06 AM2021-03-08T04:06:19+5:302021-03-08T04:06:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईचे कमाल तापमान ३७ अंशांवरून ३२ अंशांवर घसरले असले तरी उन्हाच्या झळा कायम आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईचे कमाल तापमान ३७ अंशांवरून ३२ अंशांवर घसरले असले तरी उन्हाच्या झळा कायम आहेत. विशेषत: शनिवारी घसरलेल्या कमाल तापमानानंतर रविवारी किंचित दिलासा मिळेल, अशी शक्यता होती. प्रत्यक्षात मात्र रविवारच्या दुपारी मुंबईकरांना उन्हाने चटके बसत असल्याचे चित्र होते. दुसरीकडे राज्यभरातही कडकडीत ऊन पडत असून, नागरिकांना त्याचा तडाखा बसत आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत गोव्यासह राज्यात हवामान कोरडे होते. विदर्भाच्या बहुतांश भागात, कोकण, गोव्याच्या तुरळक भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या बऱ्याच भागात किंचित वाढ झाली. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ तर, विदर्भाच्या बऱ्याच भागात किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात मात्र किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले.
पुणे, जळगाव, मालेगाव, नाशिक, सांगली, सातारा, सोलापूर, औरंगाबाद, परभणी, नांदेड, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, नागपूर आणि वर्धा या शहरांचे कमाल तापमान ३६ ते ३८ अंश नोंदविण्यात येत असून, वाढत्या कमाल तापमानाने नागरिक घामाघूम हाेत आहेत. ८ मार्चपासून ११ मार्चपर्यंत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहील, तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली.
* शहरांचे रविवारचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
मुंबई ३५.६, जालना ३६, पुणे ३६.४, बारामती ३६.१, सातारा ३६.६, उस्मानाबाद ३६.९, नांदेड ३७, सांगली ३७.२, परभणी ३७.८, जळगाव ३८, मालेगाव ३८.६.---------------------------