मुंबई - शहर व उपनगरासह सर्वच मुंबईकरांना उन्हाचे चटके बसू लागले आहे. तापमानवाढीमुळे लोकांना त्रास सहन करन करावा लागत आहे. त्यात अलीकडेच महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला उपस्थित लोकांपैकी काहींना उष्माघाताचा त्रास झाला. उन्हामुळे प्रकृती ढासळली, अनेकांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या दुर्घटनेत ११ लोकांचा जीव गेला. डोक्यावर सूर्य तापला आहे त्यामुळे मुंबईकरांनी आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सार्वजनिक आरोग्य खाते त्या-त्या ऋतुंमध्ये घ्यावयाच्या काळजीबाबत आवश्यकतेनुसार वेळोवेळी मार्गदर्शक सूचना जारी करीत असते. याच अनुषंगाने सध्याच्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर ‘उन्हाळ्यामध्ये काय काळजी घ्यावी’ याबाबत कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी कळविलेल्या मुद्देनिहाय सूचना पुढीलप्रमाणे आहेतः-
- तहान लागली नसली तरी पुरेसे पाणी प्या.
- हलके, हलक्या रंगाचे, सैल आणि सच्छिद्र सुती कपडे घाला. उन्हात बाहेर जाताना संरक्षक गॉगल, छत्री / टोपी, शूज किंवा चप्पल वापरा.
- प्रवासात पाणी व कांदा सोबत ठेवा.
- मद्यपान, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड शीतपेये (कोल्ड्रिंक्स) टाळा, यामुळे शरीराचे निर्जलीकरण होते.
- उच्च प्रथिनेयुक्त अन्न टाळा आणि शिळे अन्न खाऊ नका.
- तुम्ही बाहेर काम करत असाल, तर टोपी किंवा छत्री वापरा. शक्य असल्यास मोठ्या सुती कापडाने डोके व चेहरा झाकून घ्या.
- तुमच्या डोक्यावर, मानेवर, चेहरा आणि हातपायांवर ओलसर कापडही वापरा.
- पार्क केलेल्या वाहनांमध्ये लहान मुले किंवा पाळीव प्राणी सोडू नका.
- तुम्हाला अशक्त किंवा आजारी वाटत असल्यास, ताबडतोब डॉक्टरांना भेटा.
- ओआरएस, लस्सी, तोराणी (तांदूळ पाणी), लिंबू पाणी, ताक, नारळपाणी इत्यादी घरगुती पेये नियमितपणे प्या. यामुळे शरीराला पुन्हा 'हायड्रेट' करण्यास मदत होते.
- जनावरांना सावलीत ठेवा आणि त्यांना भरपूर पाणी द्या.
- तुमचे घर थंड ठेवा, पडदे, शटर किंवा सनशेड वापरा आणि रात्री खिडक्या उघडा ठेवा.
- पंखे, ओले कपडे वापरा आणि वारंवार थंड पाण्याने आंघोळ करा.
उष्माघातामुळे बाधित झालेल्या व्यक्तीवर उपचार करण्यासाठी काय कराल?
- व्यक्तिला थंड जागी, सावलीखाली ठेवा. तिला / त्याला ओल्या कपड्याने पुसून काढा / वारंवार शरीर धुवा. डोक्यावर सामान्य तापमानाचे पाणी घाला. मुख्य गोष्ट म्हणजे त्याच्या शरीराचे तापमान कमी करा.
- व्यक्तिला 'ओआरएस' प्यायला द्या किंवा लिंबू सरबत / तोराणी किंवा जे काही शरीराला 'रीहायड्रेट' करण्यासाठी उपयुक्त आहे, असे पेय द्या.
- व्यक्तिला ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्रात घेऊन जा. उष्माघात जीवघेणा ठरू शकतो म्हणून रुग्णाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे, हे सदैव ध्यानात ठेवा.