मुंबई - आॅक्टोबर सरला तरी मुंबईचे कमाल तापमान कमी होण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. शनिवारी सांताक्रुझ आणि कुलाबा वेधशाळा येथे अनुक्रमे ३७.६, ३६ अंश तापमानाची नोंद झाली आहे. परिणामी, ऐन दिवाळीत मुंबईकरांना थंडीचे वेध लागले असतानाच मुंबईचे तापमान ३७ अंशावर नोंदविण्यात येत आहे. त्यामुळे कडाक्याचे ऊन आणि उकाडा मुंबईकरांना घाम फोडत असून, रविवारसह सोमवारी मुंबईचे कमाल तापमान ३७ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. उर्वरित भागात तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे.मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. तर, ३ ते ५ नोव्हेंबरदरम्यान कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहील. ६ आणि ७ नोव्हेंबर रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. ४ आणि ५ नोव्हेंबर रोजी मुंबई आणि आसपासच्या परिसरात आकाश अंशत: ढगाळ राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
मुंबईचे तापमान ३७.६ अंशावर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2018 6:13 AM