मुंबईचे तापमान २१.४; थंडीची चाहूल लागली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 03:56 AM2019-11-20T03:56:07+5:302019-11-20T03:56:15+5:30
चालू मोसमातील नीचांकी किमान तापमान; वातावरणातील बदलामुळे उशिराने आगमन
मुंबई : येथील किमान तापमान मंगळवारी २१.४ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले असून, या मोसमातील आतापर्यंतचे हे नीचांकी किमान तापमान आहे. परिणामी, मुंबईकरांना उशिरा का होईना, थंडीची चाहूल लागली आहे. जेव्हा उत्तरेकडून दक्षिणेकडे शीत वारे वेगाने वाहतील तेव्हा राज्यासह मुंबईच्या किमान तापमानात आणखी घट होईल. परिणामी, त्यानंतरच मुंबईकरांना झोंबणारा गारवा अनुभवता येईल.
दरम्यान, १९ नोव्हेंबर, १९५० रोजी १३.३ अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली होती. ही नोंद नोव्हेंबर महिन्यातील आतापर्यंतची सर्वाधिक कमी तापमानाची नोंद आहे, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली.
जून, जुलै, आॅगस्ट, सप्टेंबरमध्ये पावसाने मुंबईला झोडपून काढले, परतीच्या पावसानेही मुंबईतून विलंबाने माघार घेतली. आॅक्टोबर महिन्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. दिवाळीदेखील मुंबईकरांनी पावसातच साजरी केली. नोव्हेंबर उजाडला, तरी मुंबईकरांना थंडीने बगल दिली. मात्र, दिल्लीतले प्रदूषण किंचित कमी होताच, १८ नोव्हेंबरला उत्तर भारतात काही ठिकाणी किमान तापमानात घट झाली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे १९ नोव्हेंबरला मुंबईच्या किमान तापमानात घट होऊन ते २१.४ अंश सेल्सिअस झाले. सोमवारी हे तापमान २४ अंश सेल्सियस होते. वातावरणातील बदलामुळे यंदा थंडीचे आगमन उशिराने झाले आहे.
दहा वर्षांतील तापमान
वर्ष किमान तापमान दिनांक
२०१८ १९.२ १६
२०१७ १८ ३०
२०१६ १६.३ ११
२०१५ १८.४ २०
२०१४ १८.२ २७ व ३०
२०१३ १७.६ २१ व २९
२०१२ १४.६ १९
२०११ १८ १८
२०१० १९.४ २
२००९ १९.६ ४
(स्रोत : भारतीय हवामान विभाग - आयएमडी)