काेकण तापले, कमाल तापमान ३६ पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:08 AM2021-03-04T04:08:19+5:302021-03-04T04:08:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : काेकण विभागातील बहुतांश शहरांचे कमाल तापमान ३६ अंशाच्या पार गेले आहे. दुसरीकडे यंदाच्या उन्हाळ्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : काेकण विभागातील बहुतांश शहरांचे कमाल तापमान ३६ अंशाच्या पार गेले आहे. दुसरीकडे यंदाच्या उन्हाळ्यात संपूर्ण कोकणातील कमाल आणि किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत अधिक तापमान नोंदविण्यात येईल, अशी शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
एक मार्चपासून राज्यातील बहुतांश शहरांच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ नोंदविण्यात येत आहे. या शहरांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही शहरांचा समावेश आहे. समुद्रकिनारी असलेल्या मुंबई शहराचा कमाल तापमानाचा पारा मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच ३६ अंश तर, किमान तापमान २२ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येत आहे.
हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, यंदाच्या उन्हाळ्यात म्हणजेच मार्च महिन्यापासून मे महिन्यापर्यंत देशाच्या पश्चिम भागात तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ नोंदविण्यात येईल. मध्य भारताच्या पश्चिम भागात ही वाढ नोंदविण्यात येणार असून, यात कोकण प्रदेशाचा समावेश आहे. तापमान वाढीचा विचार करता गेल्या दोन दिवसांपासून सोलापूर, सांगली, कोल्हापूर, मालेगाव, रत्नागिरी, परभणी, जालना, ठाणे, पुणे, जळगाव आणि नाशिक या शहरांच्या कमाल तापमानाचा पारा छत्तीस अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत असून, गेल्या तीन दिवसांपासून मुंबईतही उष्णता वाढली आहे. विशेषतः सकाळी १० वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंतचे ऊन मुंबईकरांना तापदायक ठरत असून, कमाल तापमानाच्या आकड्यात उत्तरोत्तर वाढ नोंदविली जाईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.