मुंबई : बुधवारी मुंबईचे कमाल तापमान ३४.८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले असून, मंगळवारच्या तुलनेत बुधवारी कमाल तापमानात ३ अंशांची घसरण झाली आहे. मात्र, उकाडा कायम असून, वाढत्या उकाड्याने मुंबईकर घामाघूम होत आहेत. दुसरीकडे मुंबई शहर आणि उपनगरातील वातावरणात धूलिकणांचे प्रमाण अधिक असून, याचाही मुंबईकरांना त्रास होत आहे.मुंबई शहर आणि उपनगराचा विचार करता, येथील कमाल तापमान सातत्याने ३७ अंश नोंदविण्यात येत आहे. विशेषत: उन्हाचा तडाखा आणि वाढता उकाडा मुंबईकरांना हैराण करत आहे, शिवाय मागील तीन ते चार दिवसांपासून येथील धूलिकणांचे प्रमाण अधिक आहे, याचाही त्रास मुंबईकरांना होत आहे. येथील वातावरण निवळण्यास कमाल दोन दिवसांचा कालावधी लागेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. विदर्भात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. कोकण, गोव्याच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत कमाल तापमानात किंचित वाढ झाली आहे. विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे.हवामान खात्याच्या माहितीनुसार गुरुवारसह शुक्रवारी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश मुख्यत: निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३७, २४ अंशाच्या आसपास राहील.कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. १८ आॅक्टोबरला कोकण, गोव्यात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहील. १९ ते २१ आॅक्टोबरदरम्यान कोकण, गोवा येथे तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. मराठवाडा, विदर्भात हवामान कोरडे राहील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
तापमान घसरले तरी उकाडा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 5:22 AM