मुंबईत तापमानाचा पारा वाढला, उष्णतेच्या झळांनी मुंबईकर हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2018 08:35 PM2018-03-25T20:35:23+5:302018-03-25T20:35:23+5:30
उष्णतेच्या लाटेने महाराष्ट्र होरपळून निघत असतानाच मुंबईचे रविवारचे कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. चालू हंगामातील आतापर्यंतचे मुंबईचे हे सर्वाधिक कमाल तापमान आहे.
मुंबई : उष्णतेच्या लाटेने महाराष्ट्र होरपळून निघत असतानाच मुंबईचे रविवारचे कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. चालू हंगामातील आतापर्यंतचे मुंबईचे हे सर्वाधिक कमाल तापमान आहे. वाढत्या कमाल तापमानाने मुंबईकरांची काहिली झाली असतानाच रविवारच्या तापदायक वातावरणाने यात आणखी भर घातली आहे. रविवारच्या उष्णतेच्या झळांनी मुंबईकरांना अक्षरश: होरपळून काढले आहे. मुंबईकरांची रविवारची दुपार अत्यंत तप्त गेली असून, बसलेल्या उष्णतेच्या लाटांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. रविवारी मुंबईत तापदायक वातावरण असतानाच येथील धुळीकणांतही वाढ झाली असून, सफरकडून प्राप्त माहितीनुसार, माझगावात सर्वाधिक धूळकणांची नोंद झाली आहे. मार्च अखेरिसच कमाल तापमानात भर पडल्याने राज्यात सर्वत्रच कमाल तापमानाचा सरासरी पारा ३८-४० अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. कोकण-गोव्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. रविवारच्या सकाळच्या साडेसाठच्या नोंदीनुसार, राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान चंद्रपूर येथे ४०.४ तर सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे १६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. २६ ते २९ मार्चदरम्यान गोव्यासह संपुर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. सोमवारसह मंगळवारी मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३७, २० अंशाच्या आसपास राहील. आकाश निरभ्र राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
.................................
चाळिशी पार
मुंबई, हैद्राबाद, विदर्भ आणि मराठवाड्याच्या कमाल तापमानात उत्तरोत्तर वाढ नोंदविण्यात येईल, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. मध्य आणि दक्षिण भारतामधील तापमान सर्वसाधारण तापमानापेक्षा अधिक असेल. जम्मू, काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड येथील वातावरण कोरडे राहील. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या कमाल तापमानात वाढ नोंदविण्यात येईल. ओरिसा आणि पश्चिम बंगालमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. परिणामी येथील तापमानात किंचित घट नोंदविण्यात येईल. अरुणाचल प्रदेशसह उत्तर पूर्व राज्यात पावसाची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील कमाल तापमान ४० अंशाच्या आसपास नोंदविण्यात येईल. विदर्भ, उत्तर कोकण, मराठवाड्यात उष्णतेची लाट येईल. तेलंगणासह कर्नाटकमधील कमाल तापमानही ४० अंशाच्या घरात जाईल. महत्त्वाचे म्हणजे मुंबईचे कमाल तापमानही ४० अंशाच्या घरात नोंदविण्यात येईल.
.................................
पूर्वेकडून मुंबईसह महाराष्ट्राकडे वाहत असलेल्या उष्ण वाऱ्यामुळे मुंबईचे कमाल तापमान ४१ नोंदविण्यात आले आहे. कमाल तापमानात पाच ते सहा अंशाची वाढ होईल, असा अंदाज शनिवारीच वर्तविण्यात आला होता. उष्ण वाºयामुळे कमाल तापमानात वाढ नोंदविण्यात येत असून, २४ तासांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा कायम आहे.
- कृष्णानंद होसाळीकर, उपमहासंचालक, मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभाग
.................................
वातावरणातील धुळीकणांचे प्रमाण (पार्टीक्युलेट मॅटरमध्ये)
कुलाबा १०१
माझगाव ३९४
बीकेसी ३०१
चेंबूर २४७
अंधेरी ३१४
भांडुप १९१
मालाड १७५
नवी मुंबई ३३३