Join us

मुंबईसह राज्याचे तापमान घसरणार!, हवामान विभागाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2020 4:15 AM

 आज गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्रात हवामान राहणार कोरडे

मुंबई : राज्यात शनिवारी सर्वांत कमी किमान तापमान गोंदिया येथे १२.२ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले असून, मुंबईचे किमान तापमान १९.६ अंश नोंदविण्यात आले आहे. मुंबईसह राज्याच्या किमान तापमानात वाढ झाली असली तरीदेखील रविवारपासून मुंबईसह राज्याच्या किमान तापमानात घसरण नोंदविण्यात येईल. यात प्रामुख्याने मुंबई, नाशिक आणि पुण्याचा समावेश असेल. शनिवारी मुंबईत सर्वत्र सायंकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण नोंदविण्यात येत असतानाच ढग, आभाळ विखुरलेल्या स्वरूपात नोंदविण्यात आले.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झालीआहे. कोकण, गोवा, मराठवाड्याच्या काही भागात, तर मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात किमान तापमानात किंचित वाढ झाल्याचेही नोंदविण्यात आले आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार २६ जानेवारी रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. २७ जानेवारी रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. २८ जानेवारी रोजी कोकण, गोवा, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.मुंबईचा विचार करता रविवारी आणि सोमवारी मुंबई व आसपासच्या परिसरातील आकाश सामान्यत: ढगाळ नोंदविण्यात येईल, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तविला आहे.उत्तरेकडील हवामानाचा परिणाम- मुंबईसह राज्यभरात दुपारी आणि सायंकाळी ढगाळ वातावरण नोंदविण्यात आले. शिवाय ढग विखुरलेल्या स्वरूपात नोंदविण्यात आले. याबाबत हवामान तज्ज्ञ किरणकुमार जोहरे यांनी सांगितले, महाराष्ट्रावर उत्तरेकडील हवामानाचा परिणाम आहे. परिणामी, राज्यात हवामान ढगाळ नोंदविण्यात येत आहे.- पश्चिमेकडून जे वारे वाहत आहेत; ते वारे बाष्प घेऊन येत आहेत. वारे जेव्हा वेगाने वाहतात; तेव्हा त्याबरोबर हे ढग वाहून जातात. याच काळात एकमेकांपासून लांब जात असल्याने ते विखुरलेल्या स्वरूपात नोंदविण्यात येतात. शनिवारी मुंबईत निदर्शनास आलेले विखुरलेले ढग हे दोन ते चार किलोमीटर उंचीवर असून, यास ‘लो लेव्हल क्लाऊड’ असे म्हणतात.

टॅग्स :तापमान