मंदिरं केवळ भावनेचा नसून अर्थकारणाचा विषय, मनसेचा ठाकरे सरकारला सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2021 02:03 PM2021-08-22T14:03:52+5:302021-08-22T14:14:18+5:30
राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी भाजपच्या अध्यात्मिक आघाडीकडून वारंवार मागणी आणि आंदोलन करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यातील मंदिरे खुली करावीत, अशी मागणी करत सरकारला लक्ष्य केले होते
मुंबई - राज्य सरकारने 15 ऑगस्टपासून राज्यात जवळपास सर्वच जिल्ह्यात रात्री 10 वाजेपर्यंत दुकाने खुली ठेवण्यास मुभा दिली आहे. त्यासोबतच, शॉपिंग मॉल आणि इतरही दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र, अद्यापही सार्वजनिक कार्यक्रम आणि प्रार्थनास्थळे उघडण्यास परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे, भाजपा नेते सातत्याने मंदिरं उघडण्याची मागणी करत आहेत. आता, मनसे नेते बाळा नांदगावकर यांनीही मंदिर न उघडण्यावरुन राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी भाजपच्या अध्यात्मिक आघाडीकडून वारंवार मागणी आणि आंदोलन करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यातील मंदिरे खुली करावीत, अशी मागणी करत सरकारला लक्ष्य केले होते. आता मनसेचे नेते बाळा नांदगांवकर यांनीही ट्विट करुन राज्यातील मंदिरे खुली करावीत, अशी मागणी केली आहे.
केवळ मंदिरे उघडल्याने कोरोना चा प्रसार होतो असे कोणत्या सर्वेक्षणात आले आहे का? मंदिरे हा केवळ भावनेचा नव्हे तर अनेक शहरांच्या अर्थकारणाचा विषय आहे. त्वरित सर्व मंदिरे उघडण्याचा निर्णय सरकारने घ्यावा. तसेच जशी नियमावली सगळ्यांना लागू होते तशीच इथेही लागू करावी.@CMOMaharashtra
— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) August 21, 2021
केवळ मंदिरे उघडल्याने कोरोनाचा प्रसार होतो असे कोणत्या सर्वेक्षणात आले आहे का? मंदिरे हा केवळ भावनेचा नव्हे तर अनेक शहरांच्या अर्थकारणाचा विषय आहे. त्वरित सर्व मंदिरे उघडण्याचा निर्णय सरकारने घ्यावा. तसेच, जशी नियमावली सगळ्यांना लागू होते तशीच इथेही लागू करावी, अशी मागणी नांदगावकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यामुळे, राज्यातील प्रार्थनास्थळे कधी उघडणार, तेथील अर्थकारण कधी सुरू होणार, मुख्यमंत्री कधी भूमिका घेणार हेच पाहावे लागणार आहे.
देवेंद्र फडणवीसांनीही केली होती मागणी
देवेंद्र फडणवीस हे सांगोल्यात दिवंगत नेते माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्याघरी सांत्वनपर भेटीसाठी गेले होते. त्यावेळी, पंढरपूर येथे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना, त्यांनी मंदिरे खुली करण्याची मागणी केली. आम्ही हिंदू आहोत, आमचे 36 कोटी देव आहेत, दगडातही आमचा देव आहे. 'मॉल, बारमध्ये जितकी गर्दी होते, त्यापेक्षा कमी गर्दी ही मंदिरात होते. दारूची दुकानंही सुरू आहेत. खरे तर सामाजिक अंतराचे निकष पाळून मंदिरं सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने तातडीने घेतला पाहिजे. अनेक गरिबांची उपजिविका त्यावर आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.