मंदिरे होणार चकाचक; मिळणार २,४०० कोटी; धार्मिक पर्यटनावर ग्रामविकास विभागाचा भर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2023 07:47 AM2023-09-09T07:47:07+5:302023-09-09T07:47:14+5:30
अंमलबजावणी लवकरच : गिरीश महाजन
मुंबई : राज्यातील ४८० तीर्थक्षेत्रांचा कायापालट करण्यासाठी २,४०० कोटी रुपये खर्चाची योजना ग्रामविकास विभागामार्फत राबविली जाणार आहे. ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. ब दर्जाच्या तीर्थक्षेत्रांची निवड या योजनेसाठी करण्यात आली आहे. प्रत्येक तीर्थक्षेत्रासाठी पाच कोटी रुपये देण्यात येतील. या योजनेचा आराखडा अंतिम टप्प्यात असून राज्य मंत्रिमंडळाची मान्यता घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
अ दर्जाची तीर्थक्षेत्रे ही तुलनेने आर्थिकदृष्ट्या सक्षम असतात तसेच त्यांना सरकारचा निधीही मुबलक प्रमाणात मिळतो. मात्र, ब दर्जाच्या तीर्थक्षेत्रांकडे आतापर्यंत तेवढे लक्ष दिले गेले नव्हते. या निधीतून तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय, निवारे, दर्शनदीर्घा तयार करणे, स्वच्छतेसाठीच्या उपाययोजना, भक्तांना बसण्यासाठीच्या जागा तयार करणे आदींचा समावेश असेल, अशी माहितीही मंत्री महाजन यांनी दिली.
ठाणे जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रांचा विकास
ठाणे जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र हाजी मलंग तसेच श्रीक्षेत्र शत्रुंजय तीर्थधाम भुवनभानु मानस मंदिर, मांढरदेवी देवस्थान, श्रीक्षेत्र गोंदवले, पुसेगाव, शिखर शिंगणापूर, सज्जनगड (जि. सातारा), श्रीक्षेत्र जोतिबा, श्रीक्षेत्र नृसिंहवाडी, नरसिंह लक्ष्मी देवस्थान, श्री सिद्धगिरी मठ कणेरी, श्रीदत्त देवस्थान गगनगिरी (कोल्हापूर), श्री शनेश्वर देवस्थान शनि शिंगणापूर, संत ज्ञानेश्वर देवस्थान नेवासा, तीर्थक्षेत्र पुणतांबा, श्री निळोबाराय संजीवन समाधी मंदिर पिंपळनेर, श्री कानिफनाथ मढी, श्री क्षेत्र भगवानगड, जगदंबादेवी देवस्थान, श्री कानिफनाथ मंदिर (जि. अहमदनगर), श्री घृष्णेश्वर देवस्थान (औरंगाबाद), श्री महासिद्ध महाराज देवस्थान, श्री सुपोजी संस्थान, वारी हनुमान (जि. बुलढाणा), ऋणमोचन, शेंडगाव, नागरवारी, संत गुलाबराव महाराज संस्थान (जि. अमरावती), संत मुक्ताई मंदिर (जळगाव), भैरवनाथ देवस्थान आदींचा विकास होणार आहे.
अडीच पटीने होणार वाढ
ब दर्जाच्या तीर्थक्षेत्रांना आतापर्यंत दोन कोटी रुपयांचा निधी दिला जायचा. आता त्यात अडीचपट वाढ केली जाणार आहे. विकासकामात पारदर्शकता असावी, यासाठी स्वतंत्र यंत्रणा वॉच ठेवणार आहे.