डोळखांब : गोहत्येवर कायमची बंदी आणल्यानंतरही ग्रामीण भागात गुरे चोरण्याचा प्रकार मात्र थांबताना दिसत नाही. डोळखांब परिसरात गुरे चोरणारी टोळी सक्रिय आहे. गांडूळवाड येथे रात्रीच्या सुमारास आदिवासी शेतकऱ्यांच्या खळ्यात बांधलेल्या जनावरांपैकी दोन गायींची वासरे चोरून नेण्याचा प्रयत्न चोरटे करीत असताना येथील स्थानिक आदिवासी शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले. मात्र, आरडाओरड होताच वाहनचालक व अन्य साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले. या वेळी संतप्त आदिवासी शेतकऱ्यांनी चोरीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनाची तोडफोड केली.डोळखांब परिसरातील गांडूळवाड येथील पांडुरंग भाऊ पोकळा यांच्या मालकीची गुरे खळ्यात बांधलेली असताना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास काही चोरट्यांनी झेनॉन कंपनीच्या पिकअप वाहनाचा वापर करीत दोन वासरे चोरण्याचा प्रयत्न केला. येथील शेतकऱ्यांच्या निदर्शनास येताच चोरट्यांनी सुसरवाडीनजीक वाहन टाकून पलायन केले. या वेळी वाहनाची संतप्त शेतकऱ्यांनी तोडफोड केली. याबाबत, किन्हवली पोलीस ठाण्याच्या डोळखांब दूरक्षेत्रात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सह पोलीस उपनिरीक्षक व्ही. ए. कामडी, पोलीस नाईक गाडेकर, ठाकूर, बेंडकोळी आदी चोरांचा शोध घेत आहेत. दरम्यान, गुरे चोरण्यासाठी वापरल्या गेलेल्या वाहनाचा नंबर बनावट आहे. (वार्ताहर)
गुरे चोरून नेणारा टेम्पो पकडला
By admin | Published: March 23, 2015 1:07 AM