टेम्पोचालकाचा मारेकरी २४ तासांत अटक
By admin | Published: July 21, 2014 01:34 AM2014-07-21T01:34:01+5:302014-07-21T01:34:01+5:30
कपड्यांची डिलिव्हरी करणाऱ्या मोईद्दीन शेख (२२) या टेम्पोचालकाची हत्या करणाऱ्या त्याच्या इम्रान चौधरी (२१) या मित्राला शिवाजीनगर पोलिसांनी २४ तासांत त्याला अटक केली
मुंबई : कपड्यांची डिलिव्हरी करणाऱ्या मोईद्दीन शेख (२२) या टेम्पोचालकाची हत्या करणाऱ्या त्याच्या इम्रान चौधरी (२१) या मित्राला शिवाजीनगर पोलिसांनी २४ तासांत त्याला अटक केली.
गोवंडीच्या रफिकनगरात राहणारा मोईद्दीन एका टेम्पोवर चालक म्हणून काम करत होता. शुक्रवारी तो घाटकोपरमध्ये माल पोहोचवण्यासाठी गेला होता. रात्री आठच्या सुमारास तो परत येत असताना आरोपीने टेम्पोतच त्याच्या मानेवर वार केले. मानेतून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असताना त्याने हल्लेखोराच्या तावडीतून पळ काढला आणि एक हात मानेवर ठेवून त्याने शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठले. पोलीस ठाण्यात पोहोचताच तो पोलिसांसमोरच रक्ताच्या थारोळ्यात पडला. पोलिसांनी तत्काळ त्याला राजावाडी रुग्णालयात नेले. मात्र, दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
शिवाजीनगर पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरु केला असता मृत तरुणाच्या मोबाइलवर शेवटचा कॉल आरोपीचाच होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मोईद्दीनने एका तरुणाला बेदम मारण्यासाठी आरोपीकडून दोन हजार रुपये घेतले होते. मात्र, त्याने हे काम न केल्याने आरोपीने पैसे परत करण्याची मागणी केली. याच वादातून त्यांच्यात हाणामारी झाली आणि आरोपीने चाकूने मोईद्दीनवर वार केल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)