मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ना.म. जोशी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासात तयार होणाºया नवीन घरांसाठी काढण्यात येणा-या लॉटरीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. येथील जे रहिवासी म्हाडामार्फत राबविण्यात येणा-या पुनर्विकास प्रक्रियेसाठी घरे रिकामी करून संक्रमण शिबिरांमध्ये स्थलांतरित झाले आहेत, अशा २६२ रहिवाशांची म्हाडामार्फत १५ मार्चला लॉटरी काढण्यात येणार होती. मात्र या लॉटरीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली असून, लवकरच लॉटरीची तारीख जाहीर करण्यात येईल, अशी माहिती म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत देण्यात आली. नवीन घरे अंदाजे चार वर्षांनी रहिवाशांना मिळतील़ना.म. जोशी मार्ग, वरळी आणि नायगाव येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाची प्रक्रिया राज्य शासनातर्फे म्हाडामार्फत राबविण्यात येत आहे. यापैकी ना.म. जोशी मार्गाच्या बीडीडी चाळीतील ८०० पैकी २६२ रहिवासी पहिल्या टप्प्यात संक्रमण शिबिरामध्ये (ट्रान्झिट कॅम्प) स्थलांतरित झाले आहेत. अशा रहिवाशांची १५ मार्चला लॉटरी काढण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते.यानुसार ही लॉटरी काढण्यात येणार होती. उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या महिन्यात बीडीडी चाळीसंदर्भात एक बैठक संपन्न झाली होती, त्या वेळी त्यांनी या सूचना केल्या होत्या. यामुळे रहिवाशांना पुनर्विकासामध्ये तयार होणारे आपले घर कुठे आणि कितव्या मजल्यावर असेल हे या लॉटरीमुळे रहिवाशांना समजावे यासाठी ही लॉटरी काढण्यात येणार होती. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने सार्वजनिक ठिकाणी होणारे सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आल्याने आणि गृहनिर्माण मंत्री मुंबईबाहेर असल्याने या लॉटरीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.ज्या २६२ रहिवाशांचे संक्रमण शिबिरांमध्ये स्थलांतर केले आहे त्या रहिवाशांसोबत करार करून म्हाडामार्फत मुद्रांक शुल्क भरण्यात येणार आहे. लॉटरी काढल्यावर हे मुद्रांक शुल्क म्हाडामार्फत आॅनलाइन भरण्यात येणार आहे. येत्या आठवड्यात या लॉटरीची तारीख जाहीर करण्यात येईल, अशी माहिती म्हाडामार्फत देण्यात आली आहे.
बीडीडी चाळींतील २६२ रहिवाशांना चार वर्षांनी मिळणाऱ्या घराच्या लॉटरीला तात्पुरती स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 2:15 AM