मुंबई : वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयांतील सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापकांनी २ नोव्हेंबरपासून सुरू केलेला संप गुरुवारी मागे घेतला आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते व आमदार संजय धोंड यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीनंतर हा संप मागे घेण्यात येत असल्याची घोषणा अस्थायी डॉक्टरांच्या संघटनेचे प्रतिनिधी डॉ. सुनील लवटे यांनी यावेळी दिली.वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर अस्थायी डॉक्टरांचा संप मागे घेण्यात आला आहे. वैद्यकीय शिक्षण विभागात कार्यरत असलेल्या अस्थायी तत्वावर असलेल्या सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक आदींना नियमित करावे, त्यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन आणि इतर सवलती देण्यात याव्यात आदी मागण्यांसाठी २ नोव्हेंबरपासून तब्बल ५७० हून अधिक डॉक्टरांनी बेमुदत संप पुकारला होता. मात्र आमच्या मागण्यांकडेच सरकारचे दुर्लक्ष होत असल्याने अखेर संप पुकारला होता. मात्र, आता वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आमच्या सर्वच मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत त्या तातडीने सोडविण्याचे आश्वासन दिल्याने हा संप मागे घेत असल्याचे डॉ. लवटे यांनी सांगितले.
सरकारच्या आश्वासनानंतर अस्थायी डॉक्टरांचा संप मागे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2020 3:05 AM