धोकादायक टिळक पुलाची तात्पुरती दुरुस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 01:24 AM2020-02-26T01:24:05+5:302020-02-26T01:24:07+5:30
लवकरच पुनर्बांधणी होणार
मुंबई : दादर रेल्वे स्थानक येथे असलेला ब्रिटिशकालीन टिळक पुलाचा धोका पुन्हा एकदा दिसून आला आहे़ रविवारी रात्री या पुलावरील पदपथाला तडे गेल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली़ पालिकेने त्या ठिकाणी बॅरिकेड्स उभे करून दुरुस्तीचे काम सुरू केले आहे़ मात्र या पुलाची लवकरच पुनर्बांधणी करण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पादचारी पूल दुर्घटनेनंतर मुंबईत सर्व पुलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे़ त्यामुळे या दुर्घटनेनंतर मुंबईत सर्व पुलांचे पुन्हा आॅडिट करण्यात आले़ यात दादर येथील शंभर वर्षे जुना टिळक पूलही धोकादायक असल्याने त्याची पुनर्बांधणी केली जाणार आहे.
यासाठी निधी मंजूर केला असून लवकरच त्याचे काम सुरू होणार आहे़ मात्र रविवारी रात्री या पुलावरील बाजूला असलेल्या पदपथाला तडे गेले़ काही महिन्यांपूर्वी या पुलावर असेच तडे गेले होते़ पालिका आणि रेल्वे प्रशासनाने तातडीने या ठिकाणी बॅरिकेड्स उभे केले आहेत़ तसेच पालिकेमार्फत तात्पुरती दुरुस्तीचे काम सुरू आहे़ लवकरच या पुलाची पुनर्बांधणीही केली जाणार आहे.
पालिका आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी या पुलाची पाहणी केल्यानंतर यावरील पदपथाच्या उत्तरेकडे असलेल्या टाइल्सला तडे गेल्याचे आढळून आले़ त्यामुळे तुटलेल्या टाइल्स काढून त्या ठिकाणी स्टील प्लेट बसविण्यात येणार आहेत.
टाइल्स काढल्यामुळे या पुलावरील भारही काही प्रमाणात कमी होईल़ या दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत या पदपथावरुन पादचाऱ्यांना जाण्यास मनाई केली आहे.
रेल्वे मार्गावरील ११ महत्त्वाच्या पुलांच्या पुनर्बांधणीसाठी महाराष्ट्र रेल पायाभूत विकास महामंडळाची मदत महापालिका घेणार आहे़ यात टिळक पुलाचाही समावेश आहे.