मुंबई : पंजाब नॅशनल घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सी याच्याविरुद्ध विशेष पीएमएलए न्यायालयात ‘फरारी आर्थिक गुन्हेगार कायदा २०१८’ (ईएफओ) अंतर्गत सुरू असलेल्या कारवाईला उच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली.२०१८ मध्ये मेहुल चोक्सीने देश सोडला. सध्या तो अँटिग्वा येथे आहे. त्याच्या प्रत्यार्पणाची कॅरेबियनमध्ये प्रक्रिया सुरू आहे. विशेष पीएमएलए न्यायालयात पीएनबी घोटाळ्याप्रकरणी चोक्सीवर ‘फरारी आर्थिक गुन्हेगार कायदा, २०१८’ अंतर्गत कार्यवाही सुरू आहे. चोक्सीला या कायद्यांतर्गत फरारी आर्थिक गुन्हेगार म्हणून जाहीर केले तर स्त्याची परदेशातील संपत्ती जप्त करण्याची परवानगी सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) मिळेल.विशेष न्यायालयाने सुरू केलेल्या कारवाईला स्थगिती मिळावी, यासाठी चोक्सीने उच्च न्यायालयात याचिका केली आहे. तपास यंत्रणेने कायद्याच्या नियम ३ मध्ये नमूद केलेल्या स्वरूपामध्ये तक्रार नोंदविली नाही, असा युक्तिवाद चोक्सीच्या वकिलांनी केला. त्यावर ईडीने डिसेंबर महिन्यात प्रतिज्ञापत्र दाखल करत म्हटले होते की, कारवाई चुकविण्यास चोक्सी भारतात परत येण्यास टाळाटाळ करत आहे. विशेष न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट बजावूनही त्याने भारतात येण्यास नकार दिला. पीएमएलए अंतर्गत होणारी कारवाई टाळण्यासाठी चोक्सी देश सोडून फरार झाला. त्यावर न्यायालयाने विशेष पीएमएलए न्यायालयाला याबाबत २८ दिवस निर्णय न घेण्याचे आदेश दिले.
मेहुल चोक्सीवरील ‘ईएफओ’ कारवाईला तात्पुरती स्थगिती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 4:23 AM