Join us

वांद्रे-वर्सोवा सी-लिंक प्रकल्पाला उच्च न्यायालयाची तात्पुरती स्थगिती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 1:22 AM

वांद्रे- वर्सोवा सी-लिंक प्रकल्पासाठी जुहू कोळीवाडा येथे भराव टाकून सिमेंटचा खांब उभारण्यास उच्च न्यायालयाने दोन आठवड्यांची स्थगिती दिली आहे.

मुंबई : वांद्रे- वर्सोवा सी-लिंक प्रकल्पासाठी जुहू कोळीवाडा येथे भराव टाकून सिमेंटचा खांब उभारण्यास उच्च न्यायालयाने दोन आठवड्यांची स्थगिती दिली आहे. मुख्य न्या.नरेश पाटील व न्या.एन.एम. जामदार यांच्या खंडपीठाने वरील निर्देश एमएसआरडीसीला दिले. जुहू कोळीवाडा येथील सागरी किनाऱ्यावर बेकायदेशीरपणे भराव टाकून सिमेंटचे खांब टाकण्यात येत आहेत. त्यासाठी आवश्यक त्या परवानग्या घेण्यात आलेल्या नाहीत, असा दावा आरटीआय कार्यकर्ते झोरू बथेना यांनी जनहित याचिकेद्वारे केला आहे.खांबासाठी समुद्र किनाºयावर मातीचा भराव टाकत आहे. त्यामुळे खारफुटीपर्यंत समुद्राचे पाणी पोहोचत नाही. एकप्रकारे पर्यावरणाची हानी होत आहे. या खांबामुळे सुमारे ७.९ हेक्टर समुद्र किनारा प्रभावित होणार आहे, असे बथेना यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील गायत्री सिंह यांनी न्यायालयाला सांगितले. एमएसआरडीने केलेले सर्व आरोप फेटाळताना म्हटले की, या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या घेण्यात आल्या आहेत. न्यायालयाने एमएसआरडीसीला या प्रकल्पाचे काम दोन आठवड्यांसाठी थांबविण्याचे निर्देश दिले. आदेशाचे पालन केले की नाही, हे पाहण्याचे काम सांताक्रुझ पोलिसांवर आहे.