हेरिटेज इमारतीजवळील मेट्रो-३ च्या कामाला तात्पुरती स्थगिती, उच्च न्यायालय; फोर्टमधील जे.एन. पेटिट इमारत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 05:11 AM2017-09-16T05:11:01+5:302017-09-16T05:25:42+5:30
कुलाबा-सीप्झ या मार्गावरील मेट्रो- ३ प्रकल्पासाठी सुरू असलेल्या भुयारी मार्गाच्या बांधकामामुळे जागतिक वारसा लाभलेल्या इमारतींच्या पायाला हानी पोहोचेल, अशी भीती फोर्ट येथील जागतिक वारसा असलेल्या पेटिट या संस्थेने व्यक्त केल्यानंतर
मुंबई : कुलाबा-सीप्झ या मार्गावरील मेट्रो- ३ प्रकल्पासाठी सुरू असलेल्या भुयारी मार्गाच्या बांधकामामुळे जागतिक वारसा लाभलेल्या इमारतींच्या पायाला हानी पोहोचेल, अशी भीती फोर्ट येथील जागतिक वारसा असलेल्या पेटिट या संस्थेने व्यक्त केल्यानंतर या इमारतीजवळील मेट्रो-३ च्या भुयारी मार्गाच्या बांधकामाला उच्च न्यायालयाने शुक्रवारी दोन आठवड्यांची तात्पुरती स्थगिती दिली.
मेट्रो-३ च्या भुयारी मार्गाच्या कामामुळे जागतिक वारसा असलेल्या जे.एन. पेटिट संस्थेच्या ११९ वर्षे जुन्या इमारतीला हानी पोहोचत असल्याचा दावा करत जे.एन. पेटिट संस्थेच्या विश्वस्तांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. २५ अॅगस्ट रोजी जे.एन. पेटिट इमारतीच्या छताचा भाग कोसळला. मेट्रो-३ चे काम सुरू असल्याने इमारतीला सतत हादरे बसत आहेत आणि याचमुळे इमारतीचे छत कोसळले आहे, असे नमूद करत मेट्रो- ३ च्या भुयारी बांधकामामुळे फोर्ट परिसरातील जागतिक वारसा लाभलेल्या इमारतींच्या पायाला हानी पोहोचेल, अशी भीती जे.एन. पेटिट संस्थेच्या विश्वस्तांनी न्यायालयात व्यक्त केली. जागतिक वारसा लाभलेल्या इमारतींवर या कामाचा काय परिणाम होणार आहे, याचा अहवाल मिळत नाही, तोपर्यंत हे काम थांबविण्यात यावे, अशी विनंतीही संस्थेने उच्च न्यायालयाला केली. ती मान्य करत मुख्य न्या. मंजुळा चेल्लूर व न्या. नितीन जामदार यांनी या इमारतीजवळील बांधकामाला दोन आठवड्यांची स्थगिती दिली.
भुयारी मार्गाच्या बांधकामामुळे जागतिक वारसा लाभलेल्या इमारतींच्या पायांवर काय परिणाम होणार आहे? आणि इमारतींवर परिणाम न होता मेट्रोचे काम कसे सुरू राहू शकते? या बाबींचा अभ्यास करण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसीएल), जे.एन. पेटिट इन्स्टिट्यूट आणि आयआयटी-बॉम्बेच्या स्ट्रक्चरल इंजिनीअर्सची एक समिती उच्च न्यायालयाने शुक्रवारी नियुक्त केली. या समितीला दोन आठवड्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.
मेट्रो-३ अडचणीत?
जागतिक वारसा लाभलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, फ्लोरा फाउंटन, राजाभाई टॉवर, बॉम्बे हायकोर्ट, जहांगीर आर्ट गॅलरी, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय आदी इमारती फोर्ट परिसरात आहेत.
एकंदर फोर्ट परिसरातील मेट्रो-३ च्या कामाचे पुढे काय होणार याचे चित्र त्यानंतर स्पष्ट होणार आहे.