निरीक्षक दया नायक यांच्या बदलीला तात्पुरती स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:06 AM2021-05-13T04:06:50+5:302021-05-13T04:06:50+5:30
‘मॅट’चे आदेश लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : तडकाफडकी बदली करण्यात आलेल्या दहशतवादविरोधी पथकातील निरीक्षक दया नायक यांना तात्पुरता दिलासा ...
‘मॅट’चे आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : तडकाफडकी बदली करण्यात आलेल्या दहशतवादविरोधी पथकातील निरीक्षक दया नायक यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. गोंदिया येथे झालेल्या त्यांच्या बदलीला महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणाने (मॅट) तात्पुरती स्थगिती दिली आहे. त्याबाबत १५ जूनला पुढील सुनावणी होणार आहे.
गेल्या गुरुवारी त्यांच्यासह ठाणे खंडणीविरोधी पथकाचे प्रभारी राजकुमार कोथमिरे यांची गडचिरोलीला उचलबांगडी करण्यात आली होती. पोलीस मुख्यालयातून काढलेल्या या आदेशाला नायक यांनी मॅटमध्ये आव्हान दिले आहे. सदस्य ए. पी. कुरेकर यांच्या समोर झालेल्या सुनावणीमध्ये या बदलीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली. मुख्यालयाला त्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याची सूचना केली असून, पुढील सुनावणी १५ जूनला होणार आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये मुंबई व ठाण्यात अनेक वर्षे ठाण मांडून बसलेल्या ७ निरीक्षकांच्या विदर्भ व मराठवाड्यामध्ये बदल्या करण्यात आल्या आहेत. नायक यांना तात्पुरता दिलासा मिळाल्याने अन्य अधिकारीही बदलीविरुद्ध मॅटमध्ये धाव घेण्याच्या प्रयत्नात आहेत.