घरांच्या फसव्या जाहिरातांची भुरळ
By admin | Published: May 25, 2015 02:23 AM2015-05-25T02:23:34+5:302015-05-25T02:23:34+5:30
पनवेल तालुक्यात स्वस्तात घरे देतो, असे सांगून भामट्या बिल्डरांनी हजारो ग्राहकांना कोट्यवधी रुपयांना चुना लावला आहे. फसव्या जाहिरातींना
पनवेल : पनवेल तालुक्यात स्वस्तात घरे देतो, असे सांगून भामट्या बिल्डरांनी हजारो ग्राहकांना कोट्यवधी रुपयांना चुना लावला आहे. फसव्या जाहिरातींना भुलून ग्राहकांनी आपल्या आयुष्याची पुंजी लावली आहे. मात्र कित्येकांना ना घरे मिळाली ना त्यांचे पैसे परत मिळाले. आता ते पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवत आहेत.
या इमारतींची ठिकठिकाणी होर्डिंग्ज आणि बॅनर्स लावून जाहिरातबाजीही जोरात सुरू आहे. त्यामध्ये विमानतळ, रेल्वस्थानक, बसस्थानक जवळ असल्याचे दाखले देत ग्राहकांना भुलवले जात आहे. एखाद्या शेतकऱ्याला टोकन द्यायचे, तेही हजारात आणि बोर्ड लावायचा. बिनशेती परवानगीकरीता एखादी बनावट फाईल तयार करायची आणि ग्राहकांनी दाखावायची. आमची फाईल सर्वात वरती आहे. १५ दिवसांत आॅर्डर येईल असे सांगून ग्राहकांना फसवायचे आणि त्यांच्याकडून बुकींगच्या नावाने पैसे घ्यायचे, असा प्रकार अनेक ठिकाणी झाला आहे. ग्राहक त्या बांधकाम व्यवसायिकाकडे येतो, तेव्हा त्याचा पत्ताच नसतो. त्यांनी भाडेतत्वावर घेतलेल्या कार्यालयालाही टाळे ठोकलेले असते.
या संदर्भात संबधीत पोलीस ठाण्यात अनेक तक्रारी आल्या आहेत. बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हेही दाखल झाले आहेत. काहींच्या हातात बेड्याही पडल्या आहेत. मात्र त्यानंतरही ग्राहकांचे पैसे परत मिळतील याची शाश्वती नाही. यातून ग्राहकांनी बोध घेण्याची आवश्यकता असल्याचे मत रिअल इस्टेट कन्सल्टन्ट सागर लेंडवे यांनी व्यक्त केले. घर घेताना प्रोजेक्ट कायदेशीर आहे, की नाही, याची पडताळणी करून घेणे महत्वाचे आहे. ज्या जमीनीवर इमारत आहे त्या जमिनीच्या कागदपत्रांचीही तपासणी करावी, असा सल्ला रिअल इस्टेट क्षेत्रातील तज्ज्ञ मोहिनीराज खोडदे यांनी दिला आहे.