Join us

समुद्रकिनारी सेल्फीचा मोह जिवावर बेतू शकतो !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 4:05 AM

मुंबई : परतीचा पाऊस व सोसाट्याचा वारा यामुळे मागील काही दिवसांपासून समुद्र खवळला आहे. भरतीच्या वेळेस लाटादेखील मोठ्या प्रमाणात ...

मुंबई : परतीचा पाऊस व सोसाट्याचा वारा यामुळे मागील काही दिवसांपासून समुद्र खवळला आहे. भरतीच्या वेळेस लाटादेखील मोठ्या प्रमाणात उसळत आहेत. उधाणलेल्या समुद्राचा आनंद घेण्यासाठी मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवर व चौपाट्यांवर नागरिकांची मोठी गर्दी जमू लागली आहे. अशावेळेस अनेक अतिउत्साही पर्यटक धाडस करून सेल्फी टिपण्यासाठी जातात. कित्येक पर्यटक अपघात होऊन जखमी होतात. सेल्फीच्या मोहात अनेकजण स्वत:चा जीव धोक्यात घालतात. अनेकदा पोलीस तसेच सुरक्षारक्षक यांनी सूचना देऊनदेखील पर्यटक त्या सूचनांचे पालन करत नाहीत. काही ठिकाणी सूचनांचे फलक लावण्यात आले नाहीत. नागरिकांना पर्यटनस्थळी जाताना काळजी घेणे गरजेचे आहे.

फिरायला जा, पण काळजी घ्या !

मरीन ड्राईव्ह - मरीन ड्राईव्ह येथे फिरायला गेल्यावर शक्यतो तेथे समुद्र किनारी असणाऱ्या कठड्यावर चालणे किंवा बसणे टाळायला हवे. तेथे लाटांना रोखण्यासाठी ठेवण्यात आलेल्या कृत्रिम दगडांवर जाण्याचे धाडस करू नये. जीव धोक्यात येऊ शकतो.

वांद्रे बँडस्टँड - वांद्रे येथील बँडस्टँड येथे समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात कातळ आहे. भरती आल्यावर येथील कातळ पूर्णपणे पाण्याखाली जातात. इतरवेळी देखील ही जागा निसरडी झालेली असते. सेल्फी टिपण्याच्या नादात पाय घसरून अपघात होण्याची शक्यता असते.

जुहू चौपाटी - जुहू चौपाटी हा संपूर्णपणे वाळूचा समुद्रकिनारा आहे. अनेकदा येथे फिरायला आलेले पर्यटक लाटांचा आनंद घेण्यासाठी या समुद्रकिनारी जातात. भरतीच्या वेळेस या लाटांमध्ये कोणीही जाऊ नये. जिवाला धोका होऊ शकतो.

वारंवार देण्यात येते धोक्याची सूचना

मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर नेहमी सुरक्षारक्षक व पोलीस तैनात असतात. काही हुल्लडबाज पर्यटकांना या सुरक्षा रक्षकांकांकडून समज देण्यात येते. तरी देखील अनेकदा पर्यटक नियम तोडून आपला जीव धोक्यात घालतात.

......................

जबाबदारी कोणाची

पर्यटन स्थळांवर गेल्यावर तेथील नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. पर्यटकांनी जबाबदारीचे भान राखून आपला जीव धोक्यात जाईल, असे कोणतेही कृत्य करू नये. भरतीच्या वेळेस समुद्रकिनाऱ्यांवर वेळोवेळी सूचना देण्यात येते. अशा वेळेस स्थानिक यंत्रणेकडून मिळालेल्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. अपघात होऊन अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. सर्व जबाबदारी ही पर्यटकांची आहे.