वरळीतील ‘आरे’चा दहा एकराचा भूखंड आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्रासाठी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 07:03 AM2022-03-28T07:03:54+5:302022-03-28T07:04:21+5:30
शासन निर्णय जारी; दुग्धशाळा, कार्यालय जाणार गोरेगावला
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वरळी येथील आरेचा १०.०७ एकराचा भूखंड आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन संकुल आणि मत्स्यालयाच्या निर्मितीसाठी हस्तांतरित करण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय (जीआर) पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाने जारी केला आहे. त्यामुळे या जागेवरील आरे महाव्यवस्थापकांचे कार्यालय आणि दुग्धशाळा गोरेगाव येथील आरे कॉलनीत हलविण्यात येणार आहे.
वरळी येथील आरेच्या भूखंडावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन केंद्र आणि मत्स्यालय उभारण्याची घोषणा राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. वरळी दुग्धशाळेची तब्बल १४.५५ एकर जागा दुग्धविकास विभागाच्या ताब्यात आहे. यात ०.७ एकरावर प्रशासकीय इमारत, आयुक्त कार्यालय, ०.९ एकरात वर्ग - ३ ची, तर २.८ एकरात वर्ग - ४ ची कर्मचारी निवासस्थाने आहेत. हा ४.५ एकराचा परिसर वगळून उरलेला १०.०७ एकराचा भूखंड आंतरराष्ट्रीय पर्यटन संकुलासाठी वापरला जाणार आहे.
वरळीतील भूखंडाचा ताबा महसूल विभागामार्फत नगर विकास विभागास हस्तांतरित केल्यानंतर महाव्यवस्थापकांचे कार्यालय आणि वरळीतील दुग्धशाळा गोरेगाव येथील आरे वसाहतीत स्थलांतरित करण्यात येणार आहे. या स्थलांतरासाठी दुग्धविकास विभागाच्या आयुक्तांनी आवश्यक कार्यवाही करावी, असे या जीआरमध्ये नमूद करण्यात आले आहे.
विनाविलंब स्थलांतर
वरळी दुग्धशाळेत मोठ्या प्रमाणावर असलेली यंत्रसामग्री गोरेगावमध्ये स्थलांतरित करण्यासाठी राज्य सरकारच्या मान्यतेने एजन्सी नियुक्त करावी आणि विनाविलंब स्थलांतरणाची कार्यवाही पूर्ण करावी, असे निर्देशही दुग्धविकास आयुक्तांना देण्यात आले आहेत.