दहा मालमत्तांचा होणार लिलाव
By admin | Published: July 8, 2016 02:15 AM2016-07-08T02:15:27+5:302016-07-08T02:15:27+5:30
ठाणे महापालिकेचा कर न भरणाऱ्यांच्या १० मालमत्तांवर टाच येणार आहे. कर विभागाने सर्व प्रभाग समित्यांना निर्देश देऊन मालमत्ता जप्त करून त्यांचा लिलाव करण्यास सांगितले आहे.
घोडबंदर : ठाणे महापालिकेचा कर न भरणाऱ्यांच्या १० मालमत्तांवर टाच येणार आहे. कर विभागाने सर्व प्रभाग समित्यांना निर्देश देऊन मालमत्ता जप्त करून त्यांचा लिलाव करण्यास सांगितले आहे. यानुसार, पुढील आठवड्यात वागळे प्रभागमधील ९ आणि माजिवडा-मानपाडा प्रभागातील एका मालमत्तेचा लिलाव होणार आहे. एकूण १० मालमत्तांची १० लाख १० हजार ८४ रुपयांची थकबाकी असून या मालमत्तांची किंमत ८ कोटी ३० लाख ७ हजार ९१ रु पये आहे. या घेण्यास कोणी पुढे न आल्यास त्या ठाणे महापालिका नाममात्र एक रुपयामध्ये घेऊ शकणार आहे. विशेष म्हणजे प्रभागस्तरावर लिलाव झालेल्या मालमत्ता १९९२ पासून स्थावर मालमत्ता विभागाकडे वर्ग झाल्या नसल्याचे समोर आले आहे.
यातील अनेक जप्त मिळकती धोकादायक झाल्या आहेत. याबाबत काहीही निर्णय प्रशासन घेत नाही. त्यामुळे रहिवासी भाडेकरू जीव मुठीत घेऊन राहत आहेत. मालमत्ता पालिकेची असल्याने पूर्ण थकबाकी भरल्यानंतर तिची विक्री करता येते. मात्र, पालिकेची थकबाकी शिल्लक ठेवून व्यवहार झाला असल्यास पालिकेने कारवाई करणे अपेक्षित आहे.
जप्त केशवभुवनची मिळकत नानजी करसन कारिया यांनी स्वत:च्या नावे करून घेतली आहे. ठाणे महापालिका थकबाकीदारांच्या मालमत्तांचा लिलाव करते, मात्र पुढे त्यांचे काय होते, याची माहिती त्यांच्याकडे दिसत नाही.
कर विभागात आतापर्यंत एकूण लिलाव झालेल्या मिळकतींची माहिती संकलित नाही. हीच
स्थिती प्रभागस्तरावरदेखील आहे. (प्रतिनिधी)
पालिकेला पडला होता लिलाव प्रक्रियेचा विसर
मार्चअखेर मालमत्ता कर जमा करावा लागतो. १० हजार रु पयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या करधारकांची नावे प्रसिद्ध केली जातात. डिमांड नोटीसला दाद न देणाऱ्यांच्या घरावर जप्ती वॉरंट काढले जाते. जप्त मिळकत मुदतीत सोडवली गेली नाही तर तिचा लिलाव करण्यात येतो.
लिलाव झालेली मिळकत विकत घेण्यास मालक मिळाला नाही, तर एक रु पयात ती मनपा घेते. ही प्रक्रि या पूर्ण झाल्यानंतर स्थायी समितीपुढे प्रस्ताव ठेवून मान्यतेनंतर सदर मिळकत स्थावर विभागाकडे सोपवली जाते.
या प्रक्रियेचा विसर पालिकेच्या प्रभाग समित्यांना पडला असल्याने १९९२ नंतर ही प्रक्रि या बासनात गुंडाळून ठेवलेली आहे. १९७८ पासून केवळ २३४ जप्त मालमत्ता पालिकेच्या ताब्यात आहेत. मात्र, पालिकेच्या गोंधळामुळे अनेकांनी पालिकेने जप्त केलेल्या मिळकती स्वत:च्या नावावर केल्या आहेत.
याबाबत कर विभागातून माहिती घेतली असता जप्त मिळकतीबाबत माहिती उपलब्ध नसल्याचे सांगितले.