मुंबई : ओला व सुका कचरा स्वतंत्र जमा करण्याच्या मोहिमेला पालिकेच्या स्थायी समितीच्या पदाधिकाऱ्यांमुळे खो बसत आहे. कचरा वर्गीकरणासाठी दहा लाख डबे खरेदी करण्याचा प्रस्ताव शनिवारी झालेल्या स्थायीच्या बैठकीत होता. मात्र त्यावर फारशी चर्चा न करता तो राखीव ठेवण्यात आला. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपापल्या वॉर्डात डबे वितरित करण्यासाठी उत्सुक असलेल्या नगरसेवकांची प्रतीक्षा लांबणीवर पडली आहे. स्थायीचे अध्यक्ष यशोधर फणसे यांनी प्रस्ताव रोखल्याने नगरसेवकांत नाराजी पसरली आहे.मुंबईत कचऱ्याची समस्या वाढत असल्याने पुनर्प्रक्रिया करून कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे अनेक प्रकल्प आले. ओला व सुका कचरा याचा प्रयोगही झाला, मात्र कचरा वेगळा करून ठेवण्याचा नागरिक कंटाळा करीत असल्याचे दिसून आल्यानंतर पालिकेने कचऱ्याचे दोन डबे वितरित करण्याचे ठरवले. त्यानुसार घरोघरी कचऱ्याचे दोन डबे देण्यासाठी १० लाख डब्यांची खरेदी करण्यात येणार आहे. डब्यासाठी ११ कोटी खर्च करण्याचा प्रस्ताव प्रशासन आणेल. हे डबे विभागांमध्ये नागरिकांना वाटता यावे, यासाठी नगरसेवक आग्रही होते. त्याबाबतची मागणी सर्वप्रथम शिवसेनेचे नगरसेवक रमेश कोरगावकर यांनी केली होती. निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी लवकरात लवकर हे डबे मतदारांपर्यंत पोहोचावेत, अशी सर्व नगरसेवकांची इच्छा आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत खरेदीबाबत निर्णय होईल, अशी सर्वांची अपेक्षा होती. मात्र स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी हा प्रस्ताव रोखला. त्यामुळे त्यांचा हिरमोड झाला असून प्रतीक्षा लांबणीवर पडली आहे. (प्रतिनिधी)कचरा ठरत आहे डोकेदुखी- शहर व उपनगरात दररोज नऊ हजार मेट्रिक टन कचऱ्याची निर्मिती होत असते. - मुलुंड कचराभूमी बंद करण्याची प्रक्रिया सुरू असून देवनारचीही क्षमता संपली आहे. त्यामुळे पालिकेला कचऱ्याचा भार कमी करण्यासाठी पर्याय शोधणे भाग आहे. - ओला व सुका कचरा वर्गीकरण सक्तीचे करण्यात आले आहे. मात्र मुंबईत आजही अनेक ठिकाणी ओला व सुका कचरा नागरिक वेगळा ठेवत नाहीत, त्यामुळे त्यांना दोन स्वतंत्र डबे देण्याचा निर्णय पालिकेने घेतला
दहा लाख कचरा डबे खरेदी रखडली
By admin | Published: September 25, 2016 3:50 AM