लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीतीत १० नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यास राष्ट्रीय आयोगाने परवानगी दिली. या महाविद्यालयांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे केले जाणार आहे.
यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी नड्डा, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, खा. अरविंद सावंत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
अध्यापक भरती सुरू
राज्यात नाशिक, मुंबई, गडचिरोली, अंबरनाथ, हिंगोली, जालना, वाशिम, बुलढाणा, अमरावती, भंडारा या ठिकाणी ही नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या याच वर्षी सर्व वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेश दिले जाणार आहेत. वैद्यकीय शिक्षण विभागाने ही वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाची काही रुग्णालये वर्ग करून घेतली आहेत. तसेच विद्यार्थ्यांना वसतिगृह उपलब्ध व्हावे म्हणून काही ठिकाणी इमारती भाड्याने घेतल्या आहेत. तसेच काही ठिकाणी कंत्राटी पद्धतीवर अध्यापक भरती सुरू केली आहे.