पीएनबी बॅँकेच्या घोटाळ्याप्रकरणी कर्मचाऱ्यांसह दहाजणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 08:51 PM2018-12-19T20:51:09+5:302018-12-19T20:52:01+5:30
सीबीआयची कारवाई
मुंबई : साडेनऊ हजार कोटीचे कर्ज घोटाळा करुन परदेशात पसार झालेल्या नीरव मोदी व मेहुल चोकसी यांना कर्ज मिळवून देण्यात सहकार्य करणाऱ्या पंजाब नॅशनल बॅँकेच्या तत्कालिन आठ अधिकाºयांसह दहा जणांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखेने (सीबीआय) मंगळवारी अटक केली. बॅँकेच्या ब्रेडी हाऊस शाखेतून बेकायदेशीरपणे ‘अंडर टेकीग’चे पत्र देण्यात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजाविली होती, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
अमर जाधव, सागर सावंत, मुख्य व्यवस्थापक बिच्चू तिवारी, व्यवस्थापक यशवंत जोशी, शाखा प्रमुख संजय प्रसाद, अधिकारी प्रफुल्ल सावंत, व मुख्य अंतर्गत लेखापाल मोहिदर शर्मा, ईश्वरदास अगरवाल व आदित्य रसीवसा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अगरवाल व आदित्य हे चोक्सीच्या कंपनीतील संचालक आहेत. तर उर्वरित आठजण हे पीएनबी बॅँकेचे तत्कालिन कर्मचारी आहेत. सर्वाना २१ डिसेंबरपर्यत सीबीआयची कोठडी मिळाली आहे. या घोटाळ्याप्रकरणी निवृत्त कर्मचारी गोकुळनाथ शेट्टी, एक खिडकी योजनेतील आॅपरेटर मनोज खरात यांना अटक झालेली आहे.
बहुचर्चित पंजाब नॅशनल बॅँकेच्या घोटाळ्यामध्ये गेल्या मार्चमध्ये मेहुल चोक्सी व नीरव मोदीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अन्य बॅँकेतून कर्ज मिळवून देण्यासाठी लेटर ऑफ अंडरटेकींग ( एलओयू) देण्यात बॅँकेच्या शाखेतील तत्कालिन कर्मचाºयांना सहभाग होता. त्यांनी चांद्री पेपर्स व अॅलिड प्रोडक्ट्सला पुरविले होते. एप्रिल २०१७ मध्ये त्यांनी ही पत्रे बेल्जियमच्या एसबीआय बॅँकेच्या नावे दिल्याचे तपासातून स्पष्ट झाले होते. त्यानंतर त्यांनी रक्कम उचलली आणि त्याची परतफेड न केल्याने त्याचा बोजा पीएनबी बॅँकेवर टाकण्यात आला आहे. याबाबत आणखी काहीजणांना अटक होण्याची शक्यता अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.