मुंबईत आजपासून दहा टक्के पाणीकपात; १३ डिसेंबरपर्यंत होणार कमी दाबाने पाणीपुरवठा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2019 04:10 AM2019-12-07T04:10:58+5:302019-12-07T04:15:01+5:30
तलावांमधून उचललेल्या पाण्यावर पिसे जलशुद्धिकरण केंद्रात प्रक्रिया करण्यात येते.
मुंबई : पिसे उदंचन केंद्रामध्ये न्युमॅटिक गेट सिस्टीमची दुरुस्ती शनिवार, ७ डिसेंबरपासून महापालिका हाती घेणार आहे. हे काम तब्बल आठवडाभर सुरू राहणार आहे. त्यामुळे ७ ते १३ डिसेंबरपर्यंत संपूर्ण मुंबईत दहा टक्के पाणीकपात लागू करण्यात येणार आहे.
तलावांमधून उचललेल्या पाण्यावर पिसे जलशुद्धिकरण केंद्रात प्रक्रिया करण्यात येते. त्यानंतर, संपूर्ण मुंबईत पाणीपुरवठा केला जातो. या पिसे उदंचन केंद्रातील न्युमॅटिक गेट सिस्टीमच्या दुरुस्तीचे काम ३ डिसेंबर रोजी करण्यात येणार होते, परंतु
६ डिसेंबर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईत येणाऱ्या अनुयायांची गैरसोय टाळण्यासाठी हे काम, तसेच पाणीकपात पुढे ढकलण्यात आली होती.
दरम्यान, शनिवार, ७ डिसेंबर रोजी सकाळी या दुरुस्ती कामाला सुरुवात होणार आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे नियोजन असून शुक्रवार, १३ डिसेंबरपर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यामुळे या कालावधीत मुंबईत दहा टक्के पाणीकपातीसह कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. नागरिकांनी या काळात पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.