मुंबई : पांजरापूर संकुलातील मुंबई तीन अ उदंचन केंद्रामध्ये ९०० मिलीमीटर व्यासाची झडप बसविण्याचे काम २६ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू करण्यात येणार आहे. या काळात २७ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत उदंचन केंद्र बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत पश्चिम उपनगरे, शहर भागातील सायन, परळ, माटुंगा, वडाळा वगळून सर्व विभाग तर पूर्व उपनगरात कुर्ला व घाटकोपरमध्ये होणाऱ्या पाणीपुरवठ्यात दहा टक्के कपात करण्यात येणार आहे.
मुंबईतील काही भागांमध्ये येणाऱ्या पाण्याच्या समस्या दूर करून सुरळीत पुरवठा होण्यासाठी हे काम हाती घेण्यात आले आहे. पालिकेतर्फे पिसे पांजरापूर संकुलातील पांजरापूर येथील मुंबई ३ अ उदंचन केंद्रामध्ये ८० दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेचा एक नवीन उदंचन संच बसविण्यात येणार आहे. हा उदंचन संच बसविण्यापूर्वी ९०० मिलीमीटर व्यासाची एक नवीन झडप बसविण्यात येणार आहे. हे काम २४ तास चालणार असल्याने भांडुप संकुलास होणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये सुमारे दहा टक्के कपात केली जाणार आहे. या कालावधीत पाण्याचा आवश्यक तितका साठा करा, काटकसरीने पाणी वापरून पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.