मांजामुळे पोलिसाच्या गळ्याला पडले दहा टाके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:07 AM2021-01-19T04:07:49+5:302021-01-19T04:07:49+5:30
मित्रांनो, मांजाचा वापर करू नका : जखमी पोलिसाचे आवाहन लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मांजा गळ्यात अडकल्यामुळे वरळी पोलीस ...
मित्रांनो, मांजाचा वापर करू नका : जखमी पोलिसाचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मांजा गळ्यात अडकल्यामुळे वरळी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जखमी झाले. त्यांच्या गळ्याला दहा टाके पडले. या दुर्घटनेनंतर, मित्रांनो, मांजाचा वापर करू नका, असे आवाहन त्यांनी केले.
वरळी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक राकेश गवळी हे रविवारी सत्र न्यायालयाचे कामकाज उरकून दुचाकीवरून पोलीस ठाण्याकडे निघाले हाेते. दुपारी ३च्या सुमारास जे. जे. उड्डाणपुलावरून जात असताना अचानक त्यांच्या गळ्याला मांजा लागल्याने ते खाली कोसळले. तेथून जात असलेल्या वाहतूक अंमलदाराचे त्यांच्याकडे लक्ष गेले. गवळी यांच्या गळ्यातून रक्तस्त्राव हाेत हाेता. अंमलदाराने तत्काळ नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती देऊन त्यांना रुग्णालयात दाखल केले. गळ्याला जबर दुखापत झाल्याने गवळी यांना दहा टाके पडले.
रविवारी त्यांच्या तक्रारीवरून अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, माझ्यासोबत घडले ते इतर कुणासोबतही घडू नये म्हणून सर्वांनी काळजी घ्यावी आणि मांजाचा वापर करू नये, असे आवाहन गवळी यांनी केले.
................................