राज्यातील दहा विद्यार्थिनींना न्यूयॉर्कमध्ये मिळणार शिष्यवृत्ती; बारावी नंतरच्या पदवी शिक्षणासाठी मिळणार लाभ

By सीमा महांगडे | Published: January 17, 2024 07:04 PM2024-01-17T19:04:05+5:302024-01-17T19:04:14+5:30

या शिष्यवृत्तीमुळे महाराष्ट्रातील दहा विद्यार्थिनींना उच्च आणि व्यावसायिक शिक्षणासाठी न्यूयॉर्क स्थित या महाविद्यालयात प्रवेश मिळणार आहे.

Ten students from the state will receive scholarships in New York; Benefits for graduation after 12th | राज्यातील दहा विद्यार्थिनींना न्यूयॉर्कमध्ये मिळणार शिष्यवृत्ती; बारावी नंतरच्या पदवी शिक्षणासाठी मिळणार लाभ

राज्यातील दहा विद्यार्थिनींना न्यूयॉर्कमध्ये मिळणार शिष्यवृत्ती; बारावी नंतरच्या पदवी शिक्षणासाठी मिळणार लाभ

मुंबई: महिलांचे सबलीकरण व्हावे, त्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळावी तसेच आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणात खंड पडू नये म्हणून न्यूयॉर्क येथील बरो ऑफ मॅनहॅटन कम्युनिटी कॉलेज (बीएमसीसी) या समुदाय महाविद्यालयाने सन २०२४ मध्ये महाराष्ट्रातील दहा विद्यार्थिनींना इयत्ता बारावी नंतरच्या पदवी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याचे जाहीर केले आहे.

या शिष्यवृत्तीमुळे महाराष्ट्रातील दहा विद्यार्थिनींना उच्च आणि व्यावसायिक शिक्षणासाठी न्यूयॉर्क स्थित या महाविद्यालयात प्रवेश मिळणार आहे. या शिष्यवृत्तीच्या रूपाने महाराष्ट्रातील विद्यार्थिनींना आंतरराष्ट्रीय शिक्षणाची कवाडे खुली होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील पत्रकार कक्षात बुधवारी त्यांनी ही माहिती दिली. 

या संधीप्रमाणे आणखी एक अशाच प्रकारची संधी जर्मनी मधील शैक्षणिक संस्थेतही उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील असल्याचेही केसरकर यांनी नमूद केले. यावेळी बरो ऑफ मॅनहॅटन कम्युनिटी कॉलेज (बीएमसीसी)चे उपाध्यक्ष डॉ. संजय रामदथ, महानगरपालिकेच्या नियोजन विभागाच्या संचालिका डॉ. प्राची जांभेकर, शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी राजू तडवी उपस्थित होते.

ऑगस्ट २०२४ पासून शिष्यवृत्ती मिळणार 
न्यू यॉर्क (अमेरिका) येथील बरो ऑफ मॅनहॅटन कम्युनिटी कॉलेज (बीएमसीसी) या समुदाय महाविद्यालयाशी महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने केलेल्या सामंजस्य करारानुसार ही शिष्यवृत्ती ऑगस्ट २०२४ पासून देण्यात येणार आहे. या शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थिनींनी मुंबईतील जुहू स्थित श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ (एसएनडीटी) येथे संपर्क करावा. अधिक माहितीसाठी विद्यार्थिनींनी www.bmcc.cuny.edu/apply या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन डॉ. संजय रामदथ यांनी केले.  

अशी मिळणार शिष्यवृत्ती
विविध व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थिनींचा पहिल्या वर्षासाठीच्या ट्युशन खर्च सदर महाविद्यालय उचलणार आहे. त्यामुळे विद्यार्थिंनींवर कोणताही आर्थिक भार न येता त्यांचे शिक्षण सुरू राहणार आहे. या अभ्यासक्रमादरम्यान शिष्यवृत्तीप्राप्त दहा विद्यार्थिनींना राहण्याच्या खर्चातही सवलत देण्यात येणार आहे.

Web Title: Ten students from the state will receive scholarships in New York; Benefits for graduation after 12th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.