मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दहा हजार मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:07 AM2021-07-07T04:07:54+5:302021-07-07T04:07:54+5:30

मुंबई : मुंबईत २०१६ ते २०१९ या काळात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे एकूण १० हजार ७६ प्रवाशांचा मृत्यू झाला. सरासरी ...

Ten thousand deaths due to potholes on Mumbai roads | मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दहा हजार मृत्यू

मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दहा हजार मृत्यू

Next

मुंबई : मुंबईत २०१६ ते २०१९ या काळात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे एकूण १० हजार ७६ प्रवाशांचा मृत्यू झाला. सरासरी दररोज ६ प्रवासी खड्डेबळी ठरत आहेत, असा अहवाल केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने दिला आहे.

२०१८च्या तुलनेत २०१९ मध्ये वाढ झाली असून २ हजार १४० प्रवाशांना खड्ड्यांमुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. २०१८ मध्ये २ हजार १५ नागरिकांचा मृत्यू झाला होता. २०२० चा अहवाल अद्याप तयार झालेला नसून त्यासाठी मंत्रालयाकडून माहिती एकत्र करण्याचे काम सुरू आहे. रस्ते मार्ग हा एकमेव प्रवासाचा आधार कोरोना काळात सर्वसामान्य प्रवाशांचा आहे. रस्त्यांवरील तसेच महामार्गावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या प्राणांतिक अपघाताबाबत रस्ते सुरक्षासंदर्भात काम करणाऱ्या संस्थांनी पुढाकार घेऊन या गंभीर प्रकरणाकडे लक्ष वेधले आहे.

दरवर्षी महापालिकेसह सर्वच सरकारी यंत्रणेकडून रस्त्यांच्या कामांसाठी कोट्यवधींची कामे हाती घेतली जातात. पावसाळ्यात खड्डे पडणार नाहीत, पाणी तुंबणार नाही, याचे दावे केले जातात. त्यासाठी कोटींचा खर्च देखील होतो. मात्र, पावसाळ्यात खड्डे आणि पाणी साचण्यापासून मुंबईकरांची मुक्तता होत नाही. यामुळे हा पैसा नेमका जातो तरी कुठे हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. अपघात टाळण्यासाठी पावसाळ्यात वाहने हळू चालवावी, पाणी साचलेल्या ठिकाणांहून वाहन नेऊ नये, रॅश ड्रायव्हिंग करू नये, निसरड्या रस्त्यांवरून ‘झिप-झॅप’ पद्धतीने वाहन चालवू नये, असे आवाहन रस्ते सुरक्षाविषयक काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी केली आहे.

सध्या मान्सूनने मुंबईकडे पाठ फिरवली असली तरी येत्या काही दिवसांत तो सक्रिय होण्याचा अंदाज वेधशाळेकडून वर्तवण्यात आला आहे. पावसाळ्यात शहरांतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचते. तसेच कमी दृष्यमानता, पाण्याने भरलेले खड्डे, माहिती फलकांची दुरवस्था, रस्ते नियमांचे पालन न करणे ही देखील अपघातांची कारणे आहेत, असे सेव्ह लाइफ फाउंडेशनच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

कोट

खड्ड्यांमुळे होणारे अपघात बळी रोखता येऊ शकतात. असे असले तरी खड्ड्यांमुळे सातत्याने अपघात होऊन अनेकांचे जीव जात आहेत. महापालिकेने खड्ड्यांची माहिती घेण्यासाठी आणि खड्डे भरण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा. सर्व राज्य सरकारांनी मोटार वाहन कायदा २०१९ लागू करावा खड्ड्यांमुळे मृत्यू किंवा जखमी झाल्यास अभियंते आणि कंत्राटदार यांना जबाबदार धरण्यात यावे.

- पीयूष तिवारी, संस्थापक, सेव्ह लाइफ फाउंडेशन

Web Title: Ten thousand deaths due to potholes on Mumbai roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.