10 हजार रूपयांसाठी नग्नावस्थेत करून घेतली कार्यालयाची साफ सफाई
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 05:54 AM2018-12-04T05:54:28+5:302018-12-04T10:54:09+5:30
दहा हजार रुपये दिले नाही म्हणून राजस्थानच्या व्यावसायिकाला विवस्त्र करून खोलीत डांबले.
मुंबई : दहा हजार रुपये दिले नाही म्हणून राजस्थानच्या व्यावसायिकाला विवस्त्र करून खोलीत डांबले. त्याच अवस्थेत त्याच्याकडून कार्यालयाची सफाई करून घेतली. त्यानंतर याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत पैशांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार काळबादेवीमध्ये शनिवारी उघडकीस आला. या प्रकरणी एल.टी. मार्ग पोलिसांनी आशिष गांधीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मूळचे राजस्थानचे रहिवासी असलेले कपडा व्यावसायिक चंदनसिंग चौहान (४८) सध्या कर्नाटकमध्ये राहतात. कांदिवलीचे आशिष गांधी (४६) याच्याकडील साड्या ते अन्य व्यावसायिकांना विकण्याचे काम करत होते. गेल्या वर्षी गांधी याच्याकडून साड्या विकत घेत त्यांनी त्या जुबेर यांना दिल्या. त्यातील १० हजार रुपये त्यांनी गांधीला दिले. तर उर्वरित १० हजार रुपये देणे बाकी होते.
२९ नोव्हेंबर रोजी चौहान हे कामानिमित्त काळबादेवी परिसरात आले होते. काम उरकून रात्री १२ च्या सुमारास ते परतीच्या प्रवासाला निघाले. त्याच दरम्यान गांधीने चौहान यांना ओढत त्याच्या दुकानात नेले. तेथे पैसे कधी देणार? याबाबत विचारणा करत मारहाण सुरू केली. पुढे त्यांना कपडे काढण्यास सांगितले आणि विवस्त्रावस्थेत कार्यालयाची साफसफाई करून घेतली.
त्यांचे विवस्त्रावस्थेतील फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकीही त्यांना देण्यात आली. त्यानंतर त्यांना खोलीतच डांबून गांधी निघून गेला. जाताना त्यांच्याजवळील मोबाइल आणि कपडेदेखील घेऊन गेला.
१ डिसेंबर रोजी सकाळी गांधी कार्यालयात आला. त्या वेळी चौहान यांनी नातेवाइकांना फोन करून पैशांची व्यवस्था करतो असे सांगितले. गांधी तयार होताच चौहान यांनी फोनवरून गांधीच्या नकळत नातेवाइकांना घडलेला प्रकार सांगितल्यानंतर हे प्रकरण समोर आले.
>कन्नड भाषेची घेतली मदत
गांधीकडून कुटुंबीयांना पैशांसाठी फोन करण्याची संधी मिळताच, चौहान यांनी कन्नडमधून फोनवरून नातेवाइकांना आपल्याला कार्यालयात डांबून ठेवल्याची माहिती दिली. नातेवाइकांनी गांधीच्या खात्यावर पैसे जमा करत एल. टी. मार्ग पोलीस ठाणे गाठले. पोलिसांच्या मदतीमुळेच गांधीच्या कार्यालयातून चौहान यांची सुटका करण्यात नातेवाईकांना यश आले.