मुंबई : कोविड-19 चा संसर्ग झालेल्या पोलिसांच्या संख्येत एकीकडे वाढ होत असताना त्यांना मदतीसाठीही रोजी झटपट महत्वपूर्ण निर्णय घेतले जात आहेत. मुंबईतील कोरोनाबाधित पोलीस अधिकारी व अंमलदाराना तातडीने दहा हजाराचे बक्षीस दिले जाणार आहे. ही रक्कम थेट संबधितांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी त्याबाबतचे आदेश दिले आहेत. मुंबई पोलीस कल्याण निधीतून ही रक्कम कोरोनाची बाधा झालेल्याला दिली जाणार आहे.
कोरोनाचा वाढता पादुर्भाव, नाकाबंदी आणि रस्त्यावरील गर्दी हटविण्यासाठी बंदोबस्तात जुंपलेल्या पोलिसांना त्याचा संसर्ग होत आहे.विशेषतः मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील पोलिसांना या विषाणूची लागण मोट्या प्रमाणात होत आहे. सध्या 64 अधिकारी, अंमलदारना कोरोनाची लागण झालेली आहे. त्यामध्ये 42वर मुंबई पोलीस दलातील आहेत. त्यामुळे तो चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी, अंमलदार यांना या विषाणूला लढताना प्रोत्साहन आणि आर्थिक बळ मिळावे, यासाठी त्यांना तातडीने एक लाख रुपये बिनव्याजी अग्रीम देणे,आणि या विषाणूचा समावेश पोलिसांना मोफत उपचाराची सुविधा असलेल्या महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेत करण्यात आला आहे. पोलीस मुख्यालयातून घेण्यात आलेल्या या दोन महत्वपुर्ण निर्णय पोलीस व त्यांच्या कुटूंबियांना दिलासा देणारे ठरले आहेत, त्यामध्ये आता मुंबई आयुक्तांनी कोरोना बाधितांना दहा हजार देण्याचे जाहीर केले आहे. आयुक्तालयातर्गत पोलिसांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल दिल्या जाणाऱ्या बक्षीसातर्गत तरतूदीतून ही रक्कम द्यायची आहे, मात्र 2020-21 या वर्षातील अनुदान शासनाकडून मिळण्यास विलंब लागणार आहे,त्यामुळे सध्या ही रक्कम पोलीस कल्याण निधीतून दिली जाईल, शासनाकडून बक्षीसाच्या तरतूदीची रक्कम मिळाल्यानंतर ती कल्याण निधीत वर्ग केली जाणार आहे.
...यांना नाही मिळणार रक्कम !जे अधिकारी, अंमलदार विनाकारण गैरहजर, रुग्ण रजेवर, तसेच निलंबित आहेत, त्यांना ही बक्षीसाची रक्कम अजिबात मंजूर न करण्याची खबरदारी प्रशासनाने घ्यावयाची आहे.
आर्थिक आधारासाठी मदत - बजाज कोरोनाच्या प्रतिबंधासाठी प्रयत्नशील असताना त्याची लागण झालेल्या अधिकारी,अंमलदारना आर्थिक प्रोत्साहनपर हे बक्षीस दिले जाणार आहे. थेट त्यांच्या बँक खात्यावर ती जमा केली जाईल.
- नवल बजाज, सहपोलीस आयुक्त, प्रशासन, मुंबई