Join us  

दहा हजार टन डाळी, कडधान्ये जप्त

By admin | Published: October 23, 2015 2:18 AM

ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीमधील दोन गोडाऊनवर शिधावाटप विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. दोन्ही ठिकाणी तब्बल १० हजार टन डाळी व कडधान्यांचा साठा जप्त

नवी मुंबई : ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीमधील दोन गोडाऊनवर शिधावाटप विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. दोन्ही ठिकाणी तब्बल १० हजार टन डाळी व कडधान्यांचा साठा जप्त करण्यात आला आहे. सील केलेल्या मालाची किंमत ७१ कोटी रुपये असून, या प्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. औद्योगिक वसाहतीमध्ये तुर्भे परिसरामधील ‘ऋशी कोल्ड स्टोरेज’ या कंपनीमध्ये डाळीचा साठा करून ठेवला असल्याची माहिती शिधावाटप अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे शिधावाटप अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या सहकार्याने बुधवारी धाड टाकली. या गोडाउनमधून तब्बल ६१७४ टन डाळी व कडधान्यांचा साठा जप्त केला आहे. या मालाची किंमत २४ कोटी ४८ लाख ७६ हजार रुपये आहे. या प्रकरणी वाशी शिधावाटप कार्यालयामधील निरीक्षक नवीन कानपिल्लेवार यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी कोल्ड स्टोरेजमधील सुपरवायझर पुरुषोत्तम कुमार, रमेशकुमार सम्याल व पदाधिकाऱ्यांसह साठवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई केली आहे. सानपाडा येथील ‘अमर कोल्ड स्टोरेज’मध्ये डाळींचा साठा असल्याची तक्रार मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केली होती. मनसेचे महेश जाधव, कौस्तुभ मोरे, सुधीर नवले, आप्पा कोठुळे यांच्या उपस्थितीत बुधवारी कोल्ड स्टोरेजवर छापा टाकण्यात आला. दीड टन चणाडाळ, ६२३ टन राजमा, ९२४ टन चवळी, १.८५ टन मूग डाळ, २०० टन मसूर व १३२ टन सफेद वाटाणा आढळून आला. कोल्डस्टोरेजचे चालक व २७ व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.