बेडरूममध्ये रंगला दहा ते पंधरा मिनिटे हत्येचा थरार, मलबारहील हत्या प्रकरण ; एक दिवसांपूर्वीच कामावर रुजू
By मनीषा म्हात्रे | Published: March 14, 2024 04:20 PM2024-03-14T16:20:47+5:302024-03-14T16:20:58+5:30
नेपिएन्सी रोड येथील तानी हाईट्स इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ज्योती शहा (६७) या पती आणि मुलीसोबत राहण्यात होत्या. पती मुकेश शहा यांचे दक्षिण मुंबईतील पंचतारांकित हॉटेल मध्ये ज्वेलरी शॉप आहे.
मुंबई : एक दिवसांपूर्वीच कामावर ठेवलेल्या नोकरानेच ६७ वर्षीय ज्योती शहा यांची गळा दाबून हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. घरातील सीसीटिव्हीमध्ये नोकर कन्हैया कुमार संजय पंडितच्या हालचाली कैद झाल्या आहेत. तसेच, शहा यांच्या हातातील तीन लाख किंमतीच्या दोन हिरेजडीत बांगड्या देखील गायब असून, मलबारहिल पोलीस अधिक तपास करत आहे.
नेपिएन्सी रोड येथील तानी हाईट्स इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ज्योती शहा (६७) या पती आणि मुलीसोबत राहण्यात होत्या. पती मुकेश शहा यांचे दक्षिण मुंबईतील पंचतारांकित हॉटेल मध्ये ज्वेलरी शॉप आहे. मुकेश हे मुलीसोबत हा व्यवसाय सांभाळतात. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या सफाई कामगाराच्या ओळखीने
त्यांनी कन्हैया कुमार संजय पंडीत (२०) याला नोकरीवर ठेवले. कन्हैयाचे वडील शेजारच्या इमारतीत सुरक्षा रक्षक म्हणून नोकरीला असल्याने त्यांनी जास्त माहिती न घेता त्याला कामावर ठेवले. सोमवारी सकाळी ७ वाजता तो कामावर रुजू झाला. तो घरातील सर्व्हंट रूममध्ये राहण्यास होता. १६ हजाराच्या पगारावर त्याला कामावर ठेवण्यात आले होते.
मंगळवारी ज्योती यांची हाताने गळा दाबून हत्या करून तो पसार झाला. सायंकाळी घरी परतलेल्या शहा यांना ज्योती यांनी काहीच प्रतिसाद न दिल्याने दुसऱ्या चावीने घराचा दरवाजा उघडला. तेव्हा, शहा या बेशुद्धावस्थेत मिळून आल्या. त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेले. तेथे दाखल करण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. रात्री उशिराने हत्येचा गुन्हा नोंदवत, मलबारहील पोलीस अधिक तपास करत आहे.
अन् ती बॅगही कॉरिडॉरमध्ये सोडली...
शहा यांच्या घरात हॉल, किचन आणि कामगार खोलीत तीन सीसीटिव्ही लावण्यात आले होते. मंगळवारी दुपारी दीड वाजेपर्यंत मुकेश आणि त्यांची मुलगी घरात होते. त्यानंतर दोघेही घराबाहेर पडले. ज्योती या नेहमी प्रमाणे दुपारी किचन मध्ये जेवण बनवत होत्या. यावेळी कन्हैया देखील त्यांना स्वयंपाक घरात मदत करताना दिसतो. त्यानंतर नेहमी प्रमाणे दोनच्या सुमारास त्या झोपण्यासाठी बेडरूममध्ये गेल्या. त्यापाठोपाठ अडीचच्या सुमारास कन्हैया घरातील अन्य काम उरकून त्यांच्या खोलीत जातो. दहा ते पंधरा मिनिटाने बाहेर येवून त्याच्या कामगार खोलीत गेला. तेथे पँट बदलून त्याची कागदपत्रांची बॅग घेवून ३ च्या सुमारास घराबाहेर पडला. तेथेही लिफ्टची वाट बघत तीन ते चार मिनिटे घुटमळताना दिसतो. लिफ्ट येताच त्याची बॅग कॉरीडोर मध्येच सोडून तो निघून गेल्याचे दिसून येत आहे.
बॅगेत ओळखपत्र अन्...
पोलिसांनी त्याची बॅग जप्त केली आहे. या बॅगेत पोलिसांना त्याची शाळेची तसेच ओळखपत्रे मिळाली आहे. तसेच त्याच्या कामगार खोलीतही काही पुस्तके मिळून आली. त्यानुसार, तो अभ्यासही करत असल्याचे समजते. ही कागदपत्रे सोबत नेवून अर्थ नसल्याने त्याने ती बॅग तेथेच सोडून दिल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.
हत्येनंतर वडिलांना कॉल...
ज्योती शहा यांची हत्या केल्यानंतर कन्हैयाने त्याच्या वडिलांना प्रवासातील अनोळखी व्यक्तीचा क्रमांकावरून कॉल केल्याचे समजते. हाच धागा पकडून पथक त्याचा शोध घेत आहे. वडिलांसह त्याच्या मित्र मंडळीकडे पोलीस अधिक चौकशी करत आहे.
एक दिवसांपूर्वी कामावर रुजू
मूळचा बिहारचा सितामडी येथील रहिवासी असलेला कन्हैयाचे वडील येथील शेजारच्या इमारतीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. गेल्या वर्षभरापासून कन्हैया देखील मुंबईत कामाला आला. याच तानी हाईट्समध्ये शहा यांच्याकडे काम करण्यापूर्वी तो अन्य दोन कुटुंबाकडे दोन ते तीन महिन्यांसाठी काम केले आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात तो गावी लग्न उरकून वडिलांसोबत मुंबईत परतला. वडील आणि शहा यांच्याकडील सफाई कामगारांच्या सांगण्यावरून त्याला १६ हजारांची नोकरी मिळाली होती. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्यात येत आहे.
घटनाक्रम...
दुपारी १.३० - मुकेश शहा आणि मुलगी कामासाठी घराबाहेर पडले
२. - ज्योती शहा झोपण्यासाठी बेडरूममध्ये गेल्या
२.३० - कन्हैया ज्योती शहा यांच्या बेडरूममध्ये गेला
२.४५ - दहा ते पंधरा मिनिटांनी शहा यांची हत्या करून बेडरूम मधून बाहेर
३ - तीन वाजता घराबाहेर पडला
६.४५ - मुकेश शहा घरी आल्यानंतर घटना उघडकीस