दहा गिधाडांना लागले जीपीएस टॅग

By सचिन लुंगसे | Published: July 3, 2024 08:56 AM2024-07-03T08:56:45+5:302024-07-03T08:57:25+5:30

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या शास्त्रज्ञांच्या गेल्या तीन दशकातील प्रयत्नांना आता यश येताना दिसत असून, नुकतेच महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पात दहा गिधाडांना जीपीएस टॅग लावण्यात आले आहे.

Ten vultures got GPS tags | दहा गिधाडांना लागले जीपीएस टॅग

दहा गिधाडांना लागले जीपीएस टॅग

मुंबई : बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या शास्त्रज्ञांच्या गेल्या तीन दशकातील प्रयत्नांना आता यश येताना दिसत असून, नुकतेच महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पात दहा गिधाडांना जीपीएस टॅग लावण्यात आले आहे. बंदिवासात वाढविलेल्या या गिधाडांना आता निसर्गात भरारी घेण्यासाठी सज्ज केले जात आहे. या टॅगच्या सहाय्याने त्यांच्यावर देखरेख ठेवण्यात येणार असून, या मोहिमेला यश येवून महाराष्ट्रात गिधाडांची संख्या वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बीएनएचएसने आता बंदिवासात वाढलेल्या गिधाडांना निसर्ग मुक्त करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू केले. त्यासाठी देशभरातील जंगलांनजीक काही सुरक्षित ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. भारतातील महाराष्ट्र, राजस्थान, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश व आसाम येथील काही व्याघ्र प्रकल्पांची निवड करण्यात आली. पश्चिम बंगालमध्ये सुमारे ३१ तर हरियाणामध्ये ८ गिधाडांना निसर्ग मुक्त करण्यात आले. त्यांच्यावर उपग्रहाच्या माध्यमातून निगरणी ठेवण्यात आली. आकाशातून फिरत ते नजीकच्या देशात गेल्यास त्यासाठी भुतान, नेपाळ, बंगलादेश येथील पक्षी शास्त्रज्ञांसोबतही समन्वयाने काम सुरू आहे. यातील चार गिधाडे पुढे नेपाळ व भुतान येथे पोहोचल्याचे आढळून आले. यातील एकाचा वीज प्रवाह लागून मृत्यू झाला. असे असले तरी यातील निसर्ग मुक्त केलेल्या एकालाही विषबाधा (विषयुक्त अन्न मिळाले नाही) झाली नाही हे विशेष आहे.

बीएनएचएस ने हे यश लक्षात घेता महाराष्ट्र सरकारसोबत करार केला. त्या अंतर्गत महाराष्ट्रातील पेंच व ताडोबा व्याघ्र प्रकल्पात गिधाडांना निसर्ग मुक्त करण्यासाठी बंदिवास बनविण्यात आले. जानेवारी महिन्यात येथे हरियानातील पिंजोर येथून वीस गिधाड आणण्यात आले. त्यांना या दोन्ही व्याघ्र प्रकल्पात भक्ष्य खाण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. बीएनएचएसच्या पुढाकाराने महाराष्ट्र शासन, हरियाणा सरकार, भारत सरकारच्या पर्यावरण वन व हवामान बदल मंत्रालय तसेच केंद्रीय प्राधिकरण यांच्या संयुक्त प्रयातनातून ही गिधाडांना निसर्ग मुक्त करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. आता महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पात दहा गिधाडांना जीपीएस टॅग लावण्यात आले. बंदिवासात वाढविलेल्या या गिधाडांना आता निसर्गात भरारी घेण्यासाठी सज्ज केले जात आहे. या टॅगच्या सहाय्याने त्यांच्यावर देखरेख ठेवण्यात येणार आहे.

बीएनएचएसचे संचालक किशोर रिठे व क्षेत्र संचालक प्रभूनाथ शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. काझवीन उमरीगर,  डॉ. कृष्णा, हेमंत बाजपेयी, सचिन रानडे, माननसिंग महादेव, भानू प्रताप सिंह, जेफ फ्रान्सिस, जोनाथन दिकोस्ता, मोहम्मद कासिम, लखन बसुदेव, लोकेश गुर्जर, रवी शर्मा, वनपरीक्षेत्र अधिकारी राजूरकर यांनी हे काम केले.

Web Title: Ten vultures got GPS tags

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई