- मनोहर कुंभेजकरमुंबई: घाटकोपर येथील कामराज नगर येथे राहणाऱ्या १० वर्षीय कार्तिक भरत मोरे या गिर्यारोहकाने जुन्नर येथील 450 फूट उंचीचा वानरलिंगी सुळका पार करत अजून एक विक्रम स्वतःच्या नावावर करत घाटकोपरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. कार्तिक गुरुकुल शाळेत इयत्ता चौथीत शिकतो.
कार्तिकने वयाच्या सातव्या वर्षी स्वराज्याचे कारागृह असणारा आकाशाशी स्पर्धा करणारा लिंगोबाचा डोंगर किल्ले लिंगाणा सर केला. वयाच्या आठव्या वर्षी त्याने किल्ले माहुलीच्या शेजारी रक्षक म्हणून उभा असणारा वजीर सुळका सर केला, लिंगाणावीर, वजीरचा बादशाह अश्या नावाने त्याने गिर्यारोहण क्षेत्रात आपली वेगळी छाप उमटवली.
वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत कार्तिकने आज वयाच्या दहाव्या वर्षी जुन्नर येथील जीवधन किल्ल्याचा पहारेकरी म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा वानरलिंगी (खडापारशी) सुळका सर करून त्याच्या सुळक्यांच्या यादीत आजून एक चित्तथरारक सुळक्याची भर केली. या सुळक्यावर बऱ्याच गिर्यारोहकांची चढाईसाठी नेहमीच नजर असते.
सुळक्याच्या सर्वोच्च माथ्यावर पोहोचल्यावर भारताच्या तिरंगा ध्वजाला मानवंदना दिली तसेच रिलायन्स उद्योग समूहाचे संस्थापक स्वर्गीय धीरूभाई अंबानी यांना आदरांजली वाहण्यात आली. त्याच्यासोबत त्याचे सहकारी चिराग कदम, समीर भिसे,मयूर वायदंडे व आदेश पाडेकर हे देखील होते.पॉईंट ब्रेक अँडव्हेंचरचे दत्ता साळुंके, चेतन शिंदे, आणि टीम तसेच मुरबाड येथील वेदांत व्यापारी यांच्या मदतीमुळे हा सुळका सर करण्यासाठी शक्य झाले.
घाटघरच्या परिसरात असलेला हा पूर्वमुखी जीवधन किल्ला प्राचीन नाणेघाटाच्या व्यापारी मार्गाच्या संरक्षणासाठी उभारण्यात आला होता. नाणेघाटापासून जीवधन किल्ला अगदी हाकेच्या अंतरावर आहे. जीवधनच्या पायथ्याचे गांव म्हणजे घाटघर आहे तसेच आयताकार असणार्या या गडाच्या टोकाला सुमारे 450 फूट उंचीचा "वानरलिंगी" ऊर्फ खडापारशी नावाचा एक सुळका लक्षवेधी आहे.