Video : 26/11 Terror Attack : मुंबईत सागरी तटाची सुरक्षा रामभरोसेच
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 12:36 PM2018-11-24T12:36:37+5:302018-11-24T17:02:04+5:30
मुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्याला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र दहशतवादी हल्ल्याची भीती अद्याप मुंबईकरांच्या मनात कायम आहे.
मुंबई - मुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्याला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र दहशतवादी हल्ल्याची भीती अद्याप मुंबईकरांच्या मनात कायम आहे. दहा वर्षांनंतरही मुंबईच्या सागरी सुरक्षेसाठी जे काही बंदोबस्त केले गेले आहेत त्यात अनेक उणीवा असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे भविष्यात जर कुठे 26/11 सारखा हल्ला झाला तर त्याचे गंभीर परिणाम मुंबईकरांना नक्कीच भोगावे लागणार आहेत.
आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई पोलीस कार्यालयाकडे मुंबईची सागरी सुरक्षेसाठी किती नौका आहे. तसेच त्या कधी खरेदी करण्यात आल्या आहे. त्यापैकी किती नौका दुरुस्तीसाठी आहेत. सागरी सुरक्षेसाठी किती मुनष्यबळ मंजूर करण्यात आलं आहे. याबाबत माहिती अधिकार २००५ अन्वये माहिती विचारली होती. मात्र सदर माहिती देण्यासाठी मुंबई पोलीस विभागचे सहाय्यक आयुक्त (मोटार परिवहन विभाग) यांनी नकार दिला. आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी काही पत्रकारांबरोबर मुंबई पोलिस नौका विभाग, लकडा बंदर, दारूखाना, माझगांव, मुंबई या परिसरात असलेल्या गॅरेजमध्ये पाहणी केली असता तिथे जवळपास 16 सागरी बोट दुरुस्तीसाठी असल्याचं समोर आलं.
26/11 च्या हल्ल्यानंतर मुंबईच्या सागरी सुरक्षेसाठी मोठा गाजावाजा केला गेला. केंद्र सरकार तर्फे सागरी सुरक्षेसाठी 23 नवी सागरी बोटी मुंबई पोलिसांना देण्यात आल्या. त्यापूर्वी 9 बोट हे मुंबई पोलिसाच्या सागरी सुरक्षेसाठी होत्या. मात्र एकूण 32 बोटींपैकी 16 बोटी दुरुस्तीसाठी पडून आहेत. एवढंच नव्हे तर त्यापेक्षा ही अधिक चिंतेची बाब अशी आहे की सागरी सुरक्षेसाठी एकूण 464 लोकांचा स्टाफ मंजूर करण्यात आला आहे पण त्यापैकी फक्त 172 कर्मचारी आहेत. बाकीच्या जागा रिकामीच असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
एकूण 32 बोट पैकी जवळपास 16 बोट नादुरुस्त
सागरी सुरक्षेसाठी एकूण 464 अधिकारी/कर्मचारी मंजूर करण्यात आले आहेत.
फक्त 172 अधिकारी/कर्मचारी कार्यरत असून 229 जागा रिकाम्या आहेत.
पीएसआय एकूण 58, कार्यरत फक्त 20, रिकाम्या जागा - 28
सिनियर ड्रायव्हर एकूण 58, कार्यरत 12, रिकाम्या जागा - 46
पीएसआय सारंग एकूण 52, कार्यरत 6, रिकाम्या जागा - 46
ड्रायव्हर एकूण 50, कार्यरत 7, रिकाम्या जागा - 43
खलाशी एकूण 246, कार्यरत 127, रिकाम्या जागा - 119
आरटीआय कार्यकर्ते शकील शेख यांचे मते सागरी सुरक्षा हा अत्यंत महत्वाची आहे कारण मुंबई हे नेहमी अतिरेक्यांच्या टार्गेटवर असते. दहा वर्षापूर्वी कसाब आणि त्याचे साथीदार हे समुद्र मार्गानेच मुंबईमध्ये घुसले होते. मुंबईत सागरी सुरक्षा वाढवावी अस गाजावाजा नेहमीच केला जातो. मात्र समोर आलेल्या धक्कादायक माहितीनंतर सागरी सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.