दहा वर्षांनी मुलगा मायदेशी परतला; घरात कुजलेल्या अवस्थेत आढळला वडिलांचा मृतदेह
By मनीषा म्हात्रे | Published: February 11, 2018 02:44 AM2018-02-11T02:44:12+5:302018-02-11T08:49:34+5:30
शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरीसाठी एक मुलगा अमेरिका तर दुसरा मस्कतला स्थायिक झाला. कुलाब्यात राहणा-या आईवडिलांचा त्यांना विसर पडला. अशातच तीन वर्षांपूर्वी पत्नीनेही घटस्फोट घेतला. त्यानंतर एकाकी पडलेल्या ६५ वर्षीय अल फारूक कबाली यांच्या मृत्यू झाला.
मुंबई : शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरीसाठी एक मुलगा अमेरिका तर दुसरा मस्कतला स्थायिक झाला. कुलाब्यात राहणाºया आईवडिलांचा त्यांना विसर पडला. अशातच तीन वर्षांपूर्वी पत्नीनेही घटस्फोट घेतला. त्यानंतर एकाकी पडलेल्या ६५ वर्षीय अल फारूक कबाली यांच्या मृत्यू झाला. मृत्यूनंतर तब्बल १५ दिवसांनी त्यांचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला. पत्नीने मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्यावर १० वर्षांपासून संपर्कात नसलेला मस्कतमधील मुलगा मुंबईत परतला. या घटनेने सर्वांनाच सुन्न केले.
कुलाब्यातील सागरसंगीत इमारतीमधील फ्लॅट क्रमांक ३०मध्ये कबाली कुटुंब राहायचे. कबाली यांचा कापडाचा व्यवसाय होता. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एक मुलगा अमेरिकेला तर दुसरा मस्कतमध्ये स्थायिक झाला. मुलगी लग्नानंतर सासरी निघून गेली. हळूहळू मुलांचा आईवडिलांशी संवाद तुटला.
तीन वर्षांपूर्वी पत्नीनेही घटस्फोट घेतला. ती मलबार हिल परिसरात राहू लागली. आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात ते बंद घरात एकटेच राहू लागले. गेले १५ ते २० दिवस त्यांचा दरवाजा बंदच होता. गुरुवारी दुपारी त्यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती कुलाबा पोलिसांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी धाव घेत दरवाजा तोडला. तेव्हा बेडवर त्यांना कबाली यांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. १५ दिवसांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांना आहे. याबाबत पोलिसांनी सुरुवातीला त्यांच्या पत्नीला मृत्यूची बातमी दिली. मात्र घटस्फोट घेतला असल्याने त्यांच्याशी काहीही संबंध नसल्याचे तिने सांगितले. त्यानंतर त्यांनी विवाहित मुलगी आणि परदेशातील मुलांशी संपर्क साधला. त्यापैकी दोघे नॉट रिचेबल होते. तर मस्कतमधील मुलगा अलामीन (३८)शी पोलिसांचा संपर्क झाला. त्याच्या चौकशीत त्याने १० वर्षांत एकदाही वडिलांशी संपर्क साधला नसल्याची माहिती समोर आली. १० वर्षांनंतर शनिवारी तो मायदेशी परतला ते वडिलांच्या अंत्यविधीसाठी. अलामीनच्या ताब्यात मृतदेह देण्यात आला असून या प्रकरणी अपमृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती कुलाबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय धोपावकर यांनी दिली.
ना वीज, ना पाणी... कबाली श्रीमंत होते. तरीही त्यांनी ७५ हजार रुपयांचे वीज बिल थकविले होते. तसेच ते सोसायटीचे पाणी बिलही भरत नव्हते. त्यामुळे त्यांचे वीज आणि पाणी जोडणीही कापण्यात आली होती. एकलकोंडेपणामुळे ते कुणाशीच संवाद साधत नव्हते. गेले काही दिवस त्यांनी स्वत:ला खोलीत बंद करून घेतले होते.
- बंद घरात आढळला मृतदेह
- पत्नीचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार
- विवाहित मुलगी आणि परदेशातील एका मुलाशी पोलिसांनी साधला संपर्क. दोघेही होते नॉट रिचेबल