दहा वर्षांत १४ नगरसेवकांचे पद रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 02:55 AM2017-08-19T02:55:10+5:302017-08-19T02:55:12+5:30
जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने काँग्रेस नगरसेविका ट्युलिप मिरांडा यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवले आहे.
मुंबई : जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने काँग्रेस नगरसेविका ट्युलिप मिरांडा यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवले आहे. त्यामुळे त्यांचे नगरसेवक पद रद्द होण्याची शक्यता आहे. गेल्या १० वर्षांत १४ नगरसेवकांची पदे बाद झाली आहेत. यामध्ये जातीच्या बोगस प्रमाणपत्रासह दोनहून अधिक अपत्ये असलेल्या नगरसेवकांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. यापैकी नव्या महापालिकेत पद रद्द होणाºया मिरांडा या पहिल्या नगरसेविका ठरणार आहेत.
२०१२मध्ये कालिना येथील प्रभागातून ब्रायन मिरांडा निवडून आले होते. मात्र या निवडणुकीवेळी हा प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाल्याने ब्रायन यांच्या पत्नी ट्युलिप मिरांडा यांनी निवडणूक लढवली. ईस्ट इंडियन जातीचे प्रमाणपत्र सादर करून मागासवर्गीयांसाठी राखीव जागेवर त्या निवडून आल्या होत्या. मात्र जात प्रमाणपत्र समितीने त्यांचा हा दावा अमान्य केला आहे. २०१२ ते २०१७ या काळात चार नगरसेवकांची पदे रद्द झाली आहेत. यामध्ये अनुषा कोडम, भावना जोबनपुत्रा, मोहमद इसाक यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरले. तर सिराज शेख यांचे पद दोनहून अधिक अपत्ये असल्याने रद्द ठरले. २००७ ते २०१२ या काळात शिरीष चोगले, सुनील चव्हाण, लालजी यादव, रश्मी पहुडकर, नारायण पवार, प्रवीण देव्हारे, विश्वनाथ महाडेश्वर, सुभाष सावंत, अंजुमन असलम, सिमिंतीना नारकर, भारती घोंगडे यांचे पद जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने ते बाद झाले. ट्युलिप मिरांडा यांचे नगरसेवक पद रद्द करण्याच्या कारवाईवर न्यायालयाने स्थगितीचे आदेश दिले आहेत.