मुंबई / ठाणे : दादर, बोरीवली आणि ठाणे येथून पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या शिवनेरी बसच्या भाड्यात एसटी महामंडळाने कपात केली आहे. त्यामुळे दादर- स्वारगेट आणि ठाणे-स्वारगेटचे दर ८० रुपयांनी, तर बोरीवली-स्वारगेटचे दर ९० रुपयांनी कमी झाले असून सोमवारपासून लागू होणार असल्याचे परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी सांगितले.मुंबई-पुणे मार्गावर ओला-उबेर यांसारख्या टॅक्सीसेवेमुळे शिवनेरीच्या प्रवासीसंख्येवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. प्रवाशांमध्ये झालेली घट भरून काढण्यासाठी एसटीने शिवनेरी बसचे भाडे कमी केले आहे. त्यानुसार दादर - स्वारगेटच्या भाड्यात ८०, ठाणे-स्वारगेट (ऐरोलीमार्गे) भाड्यात ८०, तर बोरीवली-स्वारगेट भाड्यात ९० रुपयांनी कपात केली आहे. सध्याचे दादर-स्वारगेटचे भाडे हे ५२० रुपये असून नवीन भाडे ४४० इतके होणार आहे. तसेच सध्याचे ठाणे-स्वारगेटचे भाडे हे ५२० रुपये असून नवीन भाडे ४४० होणार आहे, तर बोरीवली-स्वारगेटचे सध्याचे तिकीट ६१५ इतके असून ते ५२५ रुपये होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, स्पर्धात्मक तिकीट दर कपातीचा प्रस्ताव एसटीच्या वाहतूक विभागाने महामंडळाकडे सादर केला.प्रवाशांसाठी या मार्गावर पर्यायी वाहतुकीपेक्षा आहे त्या दरात कपात करण्यासाठी निर्णय घेण्यात आला. लवचीक भाडेवाढ किंवा कपातीच्या संदर्भात महामंडळाला राज्य परिवहन प्राधिकरणाने दिलेल्या विशेष अधिकारानुसार दरकपात करण्यात आली.
शिवशाहीपाठोपाठ शिवनेरीचीही भाडेकपात; सोमवारपासून लागू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2019 1:06 AM